‘प्राजक्त प्रभा’ने संमेलनाच्या गाडीला स्टार्टर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 01:32 AM2021-11-19T01:32:38+5:302021-11-19T01:33:21+5:30
नाशिकमध्ये होणारे साहित्य संमेलन हे सारस्वतांचे स्नेहमिलन असून ते अत्यंत चांगल्या पद्धतीनेच करायचे आहे. संमेलनाचे आदरातिथ्य नाशिककर अतिशय उत्कृष्टपणे करतील, असा विश्वास असून प्राजक्त प्रभा पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याने संमेलनाच्या गाडीला ‘स्टार्टर’ मारला असल्याचे स्वागताध्यक्ष आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
नाशिक : नाशिकमध्ये होणारे साहित्य संमेलन हे सारस्वतांचे स्नेहमिलन असून ते अत्यंत चांगल्या पद्धतीनेच करायचे आहे. संमेलनाचे आदरातिथ्य नाशिककर अतिशय उत्कृष्टपणे करतील, असा विश्वास असून प्राजक्त प्रभा पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याने संमेलनाच्या गाडीला ‘स्टार्टर’ मारला असल्याचे स्वागताध्यक्ष आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
कालीदास कलामंदिर येथे खान्देश मराठा मंडळ आणि लोकहितवादी मंडळाच्या वतीने या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. साहित्य संमेलनाची सुरुवात प्राजक्त प्रभा कविता संग्रहाच्या प्रकाशन आणि काव्य वाचन कार्यक्रमातून झाली, त्यानिमित्ताने ते बोलत होते. यावेळी खान्देश मराठा मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील, मराठी साहित्य मंडळाचे मिलिंद जोशी, उपाध्यक्ष सुधाकर शिसोदे, प्रा.शंकर बोऱ्हाडे, मुकुंद कुलकर्णी, खान्देश मराठा मंडळाचे सचिव अविनाश पाटील, अशोक पाटील, संवादक स्वाती प्रभू मिराशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, या संमेलनात काव्य कट्ट्यासाठी सुमारे साडे नऊशेहून अधिक कवी सहभागी होणार असून काव्य वाचनाचा विक्रम होणार आहे. त्या काव्यकट्ट्याचा प्रारंभच जणू प्राजक्त प्रभा यांच्या काव्यसादरीकरणाने होणार असल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले. यावेळी अभिनेत्री आणि कवयित्री प्राजक्ता माळी म्हणाल्या की, माझी प्रत्येक कविता ही मला सहज स्फुरलेली आहे. माझ्या आयुष्यातील पहिल्या कविता सादरीकरणाचा कार्यक्रम कुसुमाग्रजांच्या पुण्यनगरीत होत असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी काही कवितांचे सादरीकरण केले. यावेळी बोलताना मिलिंद जोशी यांनी प्राजक्ताची फुले जशी आपसूकपणे जमिनीवर पडतात, तशाच तिच्या कविताही सहजतेने आल्याचेही त्यांनी नमूद केले. तिच्या कविता या तिच्या अनुभवातून, जाणिवेतून स्फुरलेल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. खान्देश मराठा मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. मुकुंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन तर अविनाश पाटील यांनी आभार मानले.
इन्फो
मी संमेलनाला नक्की येणार
मी संमेलनाला येऊ शकेन का असा विचार माझ्या मनात येत असतानाच मला मसापच्या मिलिंद जोशी यांनी या कार्यक्रमाद्वारे संमेलनाच्या आधीच येण्याची संधी दिली. त्यामुळे आता तर मी साहित्य संमेलनाला ३ डिसेंबरला नक्कीच येणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष असलेले डॉ. जयंत नारळीकर यांच्यासमोर मी बालपणी नृत्य केल्याने त्यांनी मला बक्षीस म्हणून १०१ रुपये दिल्याची आठवणदेखील प्राजक्ता माळी यांनी सांगत संमेलनासाठी उत्सुक असल्याचे नमूद केले.
इन्फो
कवितेच्या अखेरीस पद्मश्री हवे होते
भुजबळ यांनी प्राजक्त प्रभा काव्यसंग्रहातील प्यार, इश्क, मोहब्बत ही कविता साभिनय वाचून दाखवली. मी जास्त कविता वाचलेल्या नसल्या, तरी त्यातील अजून एक कविता मला आवडली. त्यात ‘अहो खोट्याची दुनिया आमची, ज्याला खोटे जमते तो यशस्वी’ अशा आशयाची असून फक्त त्या कवितेच्या अखेरीस पद्मश्री लावायला हवे होते, असे सांगून कंगनाच्या वक्तव्यासंदर्भात शालजोडीतील टोमणा लगावला.