प्रकाश आंबेडकरांनी चुकीची भूमिका घेऊ नये: संजय राऊत
By संकेत शुक्ला | Published: March 3, 2024 07:53 PM2024-03-03T19:53:40+5:302024-03-03T19:53:58+5:30
ज्यांना जेलमध्ये टाकणार होते त्यांचे पुनर्वसन केल्याचा आरोप.
नाशिक : "वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या विधानाकडे चुकीच्या अर्थाने बघू नका. ते नक्कीच आमच्यात येतील. वंचित आघाडीने आमच्यासोबत यावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्यामुळे त्यांनी चुकीची भूमिका घेऊ नये," असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. येणारी निवडणूक लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाची असून, त्यात परिवर्तन झाले नाही, तर देशात पुन्हा निवडणुकाच होणार नाहीत, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.
कृपाशंकर सिंह, अजित पवार आणि अशोक चव्हाण या तिघांना तुरुंगात टाकण्याची भाषा भाजपने केली होती. मात्र, आजची परिस्थिती काय आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. ज्यांना तुरुंगात टाकायची भाषा केली जात होती त्यांना भाजपमध्ये तिकीट दिले जाते, ही भाजपची गॅरंटी असल्याचा चिमटाही त्यांनी काढला. यानंतर भाजपला राज्यात बहुमत मिळाले तरी त्यात सगळा भरणा राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेतील फुटिरांचा असेल. भाजपचे स्वत:चे त्यात काय असेल, असा प्रश्नही त्यांनी केला.
अजित पवारांविरोधात असलेल्या ट्रकभर पुराव्यांचे काय झाले. त्यांना तुरुंगात न टाकता आज सत्तेवर बसवण्यात आले. त्या पुराव्यांचे काय झाले? पुरावे नष्ट करणे हादेखील गुन्हा आहे, असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला. याप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. सुनित्रा पवार यांनीही भाजप नेत्यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला पाहिजे, त्यानंतरच त्यांनी बारामतीत जाऊन मत मागावे, असा सल्ला राऊत त्यांनी दिला. अनिल देशमुख यांना मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेल करण्यात आले. त्याचा मी साक्षीदार आहे. ॲफिडेव्हिटवर सही करा, नाही तर तुमच्या मागे ईडी लावू, शंभर कोटी प्रकरणात या या नेत्यांची नावे घ्या, असा दबाव त्यांच्यावर टाकण्यात आला होता, असा आरोप राऊत यांनी केला.
नाशिकमध्ये आमचाच उमेदवार जिंकणार
नाशिक जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांत आमची ताकद चांगली आहे. नाशिकमध्ये आमचाच खासदार निवडून येतो. यंदा दिंडोरीतही आमचाच खासदार असेल. हेमंत गोडसे यांनी निवडणूक लढताना आपले डिपॉझिट वाचवून दाखवावे, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.