प्रकाश प्रभुणे : ‘गुरुचरित्र महिमा’ पुस्तकाचे प्रकाशन
By Admin | Published: December 18, 2014 10:46 PM2014-12-18T22:46:35+5:302014-12-18T22:46:56+5:30
गुरू ही व्यक्ती नव्हे तत्त्व
नाशिक : गुरू ही व्यक्ती नव्हे, तर तत्त्व असते. जन्म-मरणाच्या फेऱ्यांतून, लक्ष-लक्ष योनींमधून शिष्याला फक्त सद्गुरूमुळेच मुक्तता मिळू शकते. गुरूचरणी मन व बुद्धी अर्पण करणारे शिष्य हे भगवंतालाही प्रिय असतात, असे प्रतिपादन प्रकाश प्रभुणे महाराज यांनी केले.
कवी हेमचंद्र पिंपरीकर रचित ‘श्री गुरुचरित्र महिमा-काव्य’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रभुणे महाराज यांच्या हस्ते कुसुमाग्रज स्मारक येथे झाले, तेव्हा ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंत खैरनार होते. प्रभुणे म्हणाले की, गुरुचरित्र हा मुळात काव्यमय, ओवीबद्ध ग्रंथ असून, त्याचे काव्याच्या रूपात सुलभीकरण या ग्रंथात करण्यात आले आहे. तो वाचल्याने मुलांना गुरू, गुरूतत्त्व, सद्गुरू यांची जवळून ओळख होणार आहे. गुरूकडे शरीराच्या पलीकडे जाऊन पाहायला हवे. शिष्याची निष्ठा, श्रद्धा प्रखर असल्यास गुरूचेही काही चालत नाही. महाभारतातील एकलव्याच्या कथेवरून हेच स्पष्ट होते. अंघोळीने शरीरशुद्धी, स्तोत्राने मन:शुद्धी, तर ग्रंथाने बुद्धीशुद्धी होते. गुरूची ओळख करून देणाऱ्या अशाच ग्रंथाची निर्मिती कवी पिंपरीकर यांनी केली असल्याचेही ते म्हणाले. वसंत खैरनार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. गुरुचरित्राचे सुबोध, रसाळ निरूपण करण्यात आले असून, सदर लेखन हे अंत:प्रेरणेतून आल्याचे ते म्हणाले. गुरुचरित्र हा आत्मिक, भावनिक उन्नती करणारा ग्रंथ असल्याचेही त्यांनी सांगितले. स्वाती येवले यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)