जातेगाव येथील आदिवासी बांधवांना मिळणार प्रकाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 11:35 PM2017-10-05T23:35:27+5:302017-10-06T00:11:57+5:30
पिनाकेश्वर जातेगाव येथील आदिवासी बांधवांबरोबरच पिनाकेश्वर येथील मंदिराला वीज मिळणार असल्याने समाधानाचे वातावरण आहे.
येवला : पिनाकेश्वर जातेगाव येथील आदिवासी बांधवांबरोबरच पिनाकेश्वर येथील मंदिराला वीज मिळणार असल्याने समाधानाचे वातावरण आहे.
पिनाकेश्वर वस्तीत गेल्या अनेक वर्षांपासून वीज पोहचलेली नव्हती. येथील आदिवासी बांधवांनी वनविभागाकडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वारंवार मागणी केली होती. परंतु वनविभागाने जमीन देण्यास नकार दिल्याने पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड यांनी जिल्हा वन समिती अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे येथील आदिवासी बांधवांचा जमीन मिळण्यासाठीचा दावा कलम ३/२ केंद्र शासनाच्या सुधारित वनजमीन कायद्यांतर्गत प्रस्ताव दाखल केला. येथील आदिवासी बांधवांना रात्रीची वीज नसल्यामुळे समस्यांना सामोरे जावे लागत असे. गावापासून आदिवासी वस्ती तीन किलोमीटर अंतरावर असल्याने त्यांना निधीचीही आवश्यकता होती. परंतु प्रस्ताव हा जिल्हा नियोजन समितीकडे पाठवून १० लाख रुपयांची मागणी केली असून, तीही मार्गी लागली आहे. त्यामुळे येथील ३५० आदिवासी बांधवांना तसेच येथील पिनाकेश्वर महादेव मंदिरासही वीज मिळण्यासाठी मदत होणार आहे.