उपनगराध्यक्षपदी प्रमोद चोथवे बिनविरोध
By Admin | Published: December 30, 2016 11:15 PM2016-12-30T23:15:47+5:302016-12-30T23:16:09+5:30
सिन्नर : शिवसेनेकडून विजय जाधव, मंगला शिंदे तर भाजपाचे रामनाथ लोणारे यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी
सिन्नर : पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे प्रमोद झुंबरलाल चोथवे यांची बिनविरोध झाली. स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेनेचे विजय कारभारी जाधव व मंगला वसंत शिंदे याांची, तर भाजपाचे रामनाथ भाऊशेठ लोणारे यांची वर्णी लागली.
उपनगराध्यक्ष निवडीसाठी नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांची सर्वसाधारण सभा पार पडली. त्यात प्रमोद चोथवे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. पालिका निवडणुकीत आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे १७, तर भाजपाचे १० नगरसेवक विजयी झाले आहेत. प्रणाली भाटजिरे (गोळेसर) या शिवसेनेच्या गोटात सहभागी झाल्याने सेनेचे संख्याबळ १८ झाले आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे उपनगराध्यक्षपदी सेनेचे प्रमोद चोथवे यांची बिनविरोध निवड झाली.
सकाळी १० ते १२ या वेळेत उपनगराध्यक्षपदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. उपनगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे प्रमोद चोथवे यांनी अर्ज दाखल केला. त्यावर सूचक म्हणून नगरसेवक गोविंद लोखंडे, तर अनुमोदक म्हणून शैलेश नाईक यांची स्वाक्षरी होती. दुपारी १२ वाजता पालिका सभागृहात शिवसेना व भाजपा नगरसेवक दाखल झाले. नगराध्यक्ष डगळे यांनी उपनगराध्यक्ष-पदासाठी चोथवे यांचा एकमेव अर्ज आल्याचे सांगितले. त्यामुळे उपनगराध्यक्षपदी चोथवे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी मुख्याधिकारी दुर्वास यांच्या हस्ते चोथवे यांच्यासह तिघा स्वीकृत नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. सभागृहात शिवसेना नगरसेवक बाळू उगले, नलिनी गाडे, श्रीकांत जाधव, प्रतिभा नरोटे, सुजाता भगत, हेमंत वाजे, विजया बर्डे, प्रणाली भाटजिरे (गोळेसर), सुजाता तेलंग, निरूपमा शिंदे, ज्योती वामने, सोमनाथ पावसे, पंकज मोरे, गीता वरंदळ, रूपेश मुठे, भाजपाचे गटनेते नामदेव लोंढे, संतोष शिंदे, शीतल कानडी, मल्लू पाबळे, अलका बोडके, सुहास गोजरे, वासंती देशमुख, प्रीती वायचळे, मालती भोळे, चित्रा लोंढे उपस्थित होते. उपनगराध्यक्षपदी चोथवे यांच्या नावाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शिवसेना आमदार राजाभाऊ वाजे, संपर्कप्रमुख संजय बच्छाव, पंचायत समिती सदस्य उदय सांगळे, तालुकाप्रमुख दीपक खुळे यांच्यासह सेना कार्यकर्त्यांनी पालिकेत प्रवेश केला. आमदार वाजे यांच्या हस्ते उपनगराध्यक्ष प्रमोद व स्वीकृत नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर चोथवे यांनी आमदार वाजे यांच्या उपस्थितीत उपनगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. दुसरीकडे भाजपाचे विरोधी गटनेते नामदेव लोंढे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार स्वीकारला. सेना कार्यकर्त्यांनी उपनगराध्यक्ष चोथवे व स्वीकृत नगरसेवकांची विजयी मिरवणूक काढली. वावी वेस भागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला. (वार्ताहर)