प्रमोद महाजन उद्यानात रंगली दीपावली पूर्वसंध्या
By admin | Published: October 31, 2016 01:44 AM2016-10-31T01:44:53+5:302016-10-31T01:53:03+5:30
विनोदाचे फवारे : सदाबहार मैफलीला प्रतिसाद
नाशिक : विनोदी फवारे आणि स्वरांचा फराळ असा दुग्धशर्करा योग साधत शिवसेना, ऊर्जा युवा प्रतिष्ठान, शिवकेसरी कला-क्रीडा मंडळ व राणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूररोडवरील प्रमोद महाजन उद्यानात दीपावली पूर्वसंध्या मैफल रंगली. यावेळी ‘चला हवा येऊ द्या’ फेम विनोदी अभिनेता भारत गणेशपुरे आणि कुशल बद्रिके यांनी उपस्थिताना मनसोक्त हसविले, तर ‘सारेगमप’ फेम राहुल सक्सेना, सावनी रवींद्र यांनी आपल्या सुरेल आवाजाद्वारे रसिकांना मंत्रमुग्ध केले.
पाहुण्यांचे स्वागत शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, संगीता देसाई, गोकुळ पिंगळे यांनी केले. ‘बाप्पा मोरया’ गीतापासून मैफलीला प्रारंभ झाला. सावनी रवींद्र हिने आपल्या सुरेल आवाजात ‘नाही कळले कधी’, ‘अत्ताच बया का’, ‘गोऱ्या गोऱ्या’ या गाण्यांद्वारे रसिकांना रिझविले, तर राहुल सक्सेनाने ‘तेरी दिवानी’ या गीतापासून सुरु वात करीत ‘मितवा’, ‘दमादम मस्त कलंदर’ सह पंजाबी मेलेडी सादर करून रसिकांना तृप्त केले. राहुल आणि सावनीने ‘जीव रंगला’, ‘चिंब भिजलेले’, ही गाणी सादर करीत मैफल रंगवत नेली. अमोल पाळेकर यांनीही ‘लख्ख पडला प्रकाश’, ‘अश्विनी ये ना’, ‘जय मल्हार’, ‘खंडेरायाच्या लग्नाला’, ‘भगवं वादळ आलं ’ ही गिते सादर करून आपली वेगळी छाप कार्यक्र मावर सोडली.
कार्यक्र माच्या अखेरीस ‘झिंगाट’ गीतावर रसिकांनी मनसोक्त ताल धरला. संगीतसाथ अनील धुमाळ व जय भालेराव (की-बोर्ड), अभिजीत शर्मा (आॅक्टोपॅड), नीलेश सोनावणे (गिटार), मनोज गुरव ( बासरी), स्वरांजय धुमाळ व देवानंद पाटील (ढोलकी) यांनी दिली. श्रीपाद कोतवाल यांनी निवेदन दिले. कार्यक्रमास रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाळ्या, शिट्या व नृत्याच्या ठेक्याद्वारे रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.