प्राणप्रतिष्ठा सोहळा धर्मग्रंथांनुसारच, वाराणसीच्या विद्यालयाकडून अण्णाशास्त्री दातार यांच्या ग्रंथाचा दाखला
By संजय पाठक | Published: January 19, 2024 12:10 PM2024-01-19T12:10:18+5:302024-01-19T12:10:37+5:30
नाशिकचे प्रख्यात वेदविद्वान (स्व.) अण्णाशास्त्री वारे यांच्या कर्मकाण्डप्रदीप या ग्रंथाचा संदर्भ देण्यात आला आहे.
नाशिक : मंदिराचे शिखर आणि कळस अपूर्ण असताना अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा शास्त्रसंमत आहे का, यावर वाराणसीच्या श्री वल्लभराम शालीग्राम सामवेद विद्यालयाने शास्त्रार्थ देऊन उत्तर दिले. त्यात नाशिकचे प्रख्यात वेदविद्वान (स्व.) अण्णाशास्त्री वारे यांच्या कर्मकाण्डप्रदीप या ग्रंथाचा संदर्भ देण्यात आला आहे.
श्रीराम मंदिर अपूर्ण असताना प्राणप्रतिष्ठा करणे योग्य आहे का, अशी विचारणा आळंदीच्या बबनराव मस्के यांनी वाराणसीच्या गणेशशास्त्री द्रविड यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यावर द्रविड यांनी नाशिकच्या श्री अण्णाशास्त्री वारे यांच्या कर्मकाण्डप्रदीप ग्रंथाचा संदर्भ दिला. त्यातील पृष्ठ क्रमांक ३३८ मध्ये दिलेल्या माहितीचा संदर्भ देण्यात आला आहे. मंदिराचे द्वार पूर्ण झाले, गर्भगृह आच्छादित केले आहे. त्यानुसार मंदिरात कलशारोपण विधी होणार असल्याचे नमूद केले आहे.
शंकराचार्यांनी दिली अण्णाशास्त्रींना पदवी
नाशिकची वैदिक परंपरा जतन करून देशभरात लौकिक मिळवणारे अण्णाशास्त्री वारे प्रमुख होते. शंकराचार्यांनी त्यांना वैदिकतिलक अशी बहुमानाची पदवी दिली होती.
शुक्ल यजुर्वेदान्तर्गत माध्यंदिन शाखेची संहिता, पद, क्रम, जटा तसेच शेखरान्त व्याकरणाचा अभ्यास तसेच श्रौतस्मार्त कर्मकांड यावर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. तसेच शांतिकांडप्रदीप, यजुर्विधानसूत्र, प्रतिज्ञापरिशिष्ट, असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. कर्मकाण्डप्रदीप हा त्यांचा ग्रंथ शास्त्रातील प्रमाण मानला जातो.
स्व. अण्णाशास्त्री दातार यांचे धर्म व शास्त्र यासंदर्भातील स्थान मौलिक होते. त्यांचे ग्रंथ आजही प्रमाण मानले जातात, हे श्रीवल्लभराय विद्यालयाच्या पत्रातून दिसते.
- अनिता जोशी, इतिहास अभ्यासक