त्र्यंबकला अन्नपूर्णामातेची प्राणप्रतिष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:51 AM2018-02-22T00:51:38+5:302018-02-22T00:55:00+5:30

येथील श्री अन्नपूर्णामाता प्राणप्रतिष्ठा महोत्सव व शतकुंडी हवनात्मक लक्षचण्डी महायज्ञाला माजी उपस्थिती लाभणे ही माझ्यासाठी खरोखरच भाग्याची बाब असून, या मंदिरामुळे त्र्यंबकच्या वैभवात भर पडल्याचे गौरवोद्गार लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काढले.

Pranabrata of Annapurnamate of Trimbak | त्र्यंबकला अन्नपूर्णामातेची प्राणप्रतिष्ठा

त्र्यंबकला अन्नपूर्णामातेची प्राणप्रतिष्ठा

Next
ठळक मुद्देमाझ्यासाठी खरोखरच भाग्याची बाब ; सुमित्रा महाजन तीन महात्मा एकाच व्यासपीठावर त्र्यंबक क्षेत्र परिपूर्ण असून, या मंदिरामुळे शहराचा अधिकच नावलौकिक वाढेल

त्र्यंबकेश्वर : येथील श्री अन्नपूर्णामाता प्राणप्रतिष्ठा महोत्सव व शतकुंडी हवनात्मक लक्षचण्डी महायज्ञाला माजी उपस्थिती लाभणे ही माझ्यासाठी खरोखरच भाग्याची बाब असून, या मंदिरामुळे त्र्यंबकच्या वैभवात भर पडल्याचे गौरवोद्गार लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काढले.  त्र्यंबकेश्वर येथील अन्नपूर्णामातेच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी बुधवारी त्या आल्या होत्या. त्याप्रसंगी महाजन बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर महामंडलेश्वर १००८ स्वामी विश्वेश्वरानंदगिरी, खासदार हेमंत गोडसे, स्वागतध्यक्ष दिनेश मित्तल, कैलास घुले, आमदार सीमा हिरे, महायज्ञ समितीचे उपाध्यक्ष वरजिन्दर सिंह छाबडा, पवन सिंघानिया आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना महाजन म्हणाल्या, आज खरोखरच भाग्याचा दिवस असून, तीन महात्मा एकाच व्यासपीठावर आहेत. येथे उपस्थित स्वामी विश्वेश्वरानंदगिरी, स्वामी आशुतोषगिरी, हृदयानंदगिरी या तिघांना खरे तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशीच उपाधी द्यायला हवी. गेल्या अनेक दिवसांपासून या कार्यक्रमाचे आयोजक सातत्याने मला फोन करून ‘त्र्यंबक आना है’ असे सांगत होते आणि मलाही प्रश्न पडला होता की या कार्यक्रमाची तारीख काय असेल, अखेर हा योग आज जुळून आला.  इंदूरच्या नागरिकांना जसा माता अहिल्याचा आशीर्वाद आहे तसाच आशीर्वाद अन्नपूर्णा देवीचा आहे. एका श्रेष्ठ भारताची कल्पना केली असता आपण बरेच पुढे गेलो आहोत, अध्यात्मिक क्षेत्रात भारताने पुढे पाऊल ठेवले असून, आता या मंदिरामुळे त्र्यंबकची शोभा अधिकच वाढेल असे सांगत महाजन म्हणाल्या की, सद्यपरिस्थितीमध्ये त्र्यंबक क्षेत्र परिपूर्ण असून, या मंदिरामुळे शहराचा अधिकच नावलौकिक वाढेल असे त्या शेवटी म्हणाल्या. कार्यक्रमासाठी त्र्यंबकचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, दिनकर आढाव, प्रदीप बूब, महायज्ञ समितीचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, महामंत्री प्रदीप पटेल, मंत्री सुनील गुप्ता, विलास ठाकूर, शिर्डीच्या सुनंदा बाळासाहेब जाधव, कोषाध्यक्ष रतिश दशपुत्रे, प्रमुख संयोजक श्यामकुमार सिंघल, स्वामी वामदेवतीर्थ महाराज, जम्मूचे स्वामी हृदयानंद महाराज, इंदूरचे स्वामी जयेन्द्रानंदगिरी, मलेशियाचे सत्यप्रकाशानंद सरस्वती, त्र्यंबकेश्वरचे स्वामी विवेकानंदगिरी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्यामकुमार सिंघल यांनी केले, तर आभार किशोर गोएल यांनी मानले. महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंदगिरी म्हणाले की, कोणाच्या जीवनात दु:ख येता कामा नये. प्रत्येकाच्या जीवनात सुखशांती येणे गरजेचे आहे. स्वामी हरयानंदगिरी आपला अमूल्य वेळ काढून या कार्यक्रमाला त्र्यंबकनगरीत उपस्थित झाले. याचा मला आनंद वाटतो. त्र्यंबकेश्वर ही पावनभूमी या मंदिरामुळे अधिकच पावन झाल्याचे गौरवोद्गार महाराजांनी शेवटी काढले. या कार्यक्रमासाठी खास उपस्थित झालेल्या सुमित्रा महाजन यांचे महाराजांनी विशेष कौतुक केले.  अन्नपूर्णामातेचे संपूर्ण मंदिर संगमरवरात तयार  करणारे अहमदाबाद येथील वास्तुविशारद सत्यप्रकाश  यांचा विशेष गौरव सुमित्रा महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. या मंदिरासाठी त्यांनी कोणतेही शुल्क न आकारता केवळ  नारळ घेऊन ते संपूर्ण मंदिर तयार केल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.
असे झाले कार्यक्रम
कार्यक्रमस्थळी सुमित्रा महाजन यांचे ठीक ११.३० वाजता आगमन झाले. त्यानंतर प्रथम त्यांनी लक्षचण्डी यागाला भेट देत मनोभावे पूजा केली. यावेळी पौरोहित्य कल्याण दत्त (इंदूर) आणि लोकेश अकोलकर (त्र्यंबकेश्वर) यांनी केले. या लक्षचण्डी यागासाठी १०० यजमान, ७५० पुरोहित सहभागी झाले आहेत. इंदूरचे श्रवणलाल मोदी यांच्या मातोश्रींच्या प्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या भक्त निवासाचे लोकार्पण महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर अन्नपूर्णामातेच्या मंदिरात विधिवत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रथम प्रधानदेवता पूजन, सप्तशती पाठांचे हवन, वेदांच्या मंत्रोच्चारात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या शेवटी अन्नपूर्णामातेची मूर्ती महाजन यांना प्रदान करण्यात आली.

 

Web Title: Pranabrata of Annapurnamate of Trimbak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.