श्री बळी महाराज मंदिरात प्राणप्रतिष्ठा
By Admin | Published: December 15, 2015 12:27 AM2015-12-15T00:27:04+5:302015-12-15T00:32:57+5:30
सोहळा : हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील नूतन श्री बळी महाराज मंदिरात आज भक्तिभावात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यानिमित्त हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सोहळ्याचा या कार्यक्रमाने आज समारोप झाला.
संत जनार्दनस्वामी यांचे शिष्य स्वामी माधवगिरी महाराज यांच्या हस्ते सकाळी यज्ञाची पूर्णाहुती, मूर्ती प्राणप्रतिष्ठा,कलशारोहण, ध्वजारोहण आदि धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर माधवगिरी महाराजांनी बळी महाराजांविषयीच्या आख्यायिका आपल्या प्रवचनातून सांगितल्या. मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली व उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, नगरसेवक उद्धव निमसे, रुची कुंभारकर, सुनील बागुल, विनायक पांडे, सुनीता निमसे, शिवाजी निमसे आदिंसह मान्यवरांची उपस्थिती होती. वेदमूर्ती अमोल जोशी यांनी पौरोहित्य केले.
श्री बळीमहाराज अमर मित्रमंडळाच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाळू शिंदे, सुनील सूर्यवंशी, विलास सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, राजेंद्र खैरे, प्रकाश सूर्यवंशी, योगेश सोनवणे आदिंसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई-आग्रा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे जुने बळी मंदिर रस्त्याच्या मध्यभागी आले होते. त्यामुळे सदर मंदिर रस्त्याच्या कडेला स्थलांतरित करावे, अशी मागणी होती. त्यानुसार नूतन मंदिर उभारण्यात आले असून, आज विधिवत प्राणप्रतिष्ठा पार पडली. (प्रतिनिधी)