माघारी नाट्यात प्रतापदादा सोनवणेंची बंडखोरी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 01:56 AM2018-06-12T01:56:17+5:302018-06-12T01:56:17+5:30
विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणी विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी ३ वाजेपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपाचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी त्यांच्या माघारीसाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची दमछाक करीत आपली उमेदवारी कायम ठेवल्याने भाजपाचा हिरमोड झाला.
नाशिकरोड : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणी विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी ३ वाजेपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपाचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी त्यांच्या माघारीसाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची दमछाक करीत आपली उमेदवारी कायम ठेवल्याने भाजपाचा हिरमोड झाला. अर्ज माघारीत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे प्रकाश सोनवणेंसह आठ जणांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात १६ उमेदवार राहिले आहेत. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अंतिम मुदत होती. इच्छुक असलेले प्रतापदादा सोनवणे यांना भाजपाने उमेदवारी नाकारून अनिकेत विजय नवल पाटील यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या सोनवणे यांनी बंडखोरीचा झेंडा फडकावत अखेरच्या दिवशी अर्ज भरून पक्षाला जोरदार धक्का दिला. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून सोनवणे यांच्या मनधरणीसाठी प्रयत्न करण्यात आला होता. त्यासाठी सोनवणे यांचे राजकीय पुनर्वसन करण्याबरोबरच विविध महामंडळांचे अध्यक्षपदाचे आमिषही दाखविण्यात आले होते. सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सोनवणे यांच्यासह आमदार बाळासाहेब सानप, संघटनमंत्री किशोर काळकर, प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, लक्ष्मण सावजी, विजय साने, अनिल भालेराव आदी विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे सोनवणे हे माघार घेण्याची चर्चा होत असताना, भाजपाच्या पदाधिकाºयांनी सोनवणे यांचा माघारीचा अर्जही तयार केला. या सर्व पदाधिकाºयांशी एकीकडे चर्चा करीत असताना, दुसरीकडे सोनवणे यांनी निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे जाऊन आपली उमेदवारी कायम असल्याचे सांगितले व माघार घेण्यास नकार दिला. अखेर माजी मंत्री विजय नवल पाटील यांनीदेखील सोनवणे यांच्याशी चर्चा करून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. मात्र सोनवणे निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत संपून गेली. त्यामुळे भाजपाच्या पदाधिकाºयांनी विभागीय आयुक्त कार्यालयातून काढता पाय घेतला.
सोळा उमेदवार रिंगणात
टीडीएफचे भाऊसाहेब नारायण कचरे, भाजपाचे अनिकेत विजय नवल पाटील, टीडीएफ व शिवसेना पुरस्कृत किशोर भिकाजी दराडे, टीडीएफचे संदीप त्र्यंबकराव बेडसे, माजी खासदार प्रताप नारायण सोनवणे, विलास शांताराम पाटील, शालिग्राम नामदेव भिरूड, बाबासाहेब संभाजी गांगुर्डे, अमृत ऊर्फ आप्पासाहेब रामराव शिंदे, रवींद्र भिवाजी पटेकर, महादेव साहेबराव चव्हाण, शेख मुक्तार अहमद मोहम्मद कासिक, अजित किसन दिवटे, सुनील पांडुरंग पंडित, विठ्ठल रघुनाथ पानसरे, अशोक शंकर पाटील हे सोळा उमेदवार रिंगणात आहेत.
आचारसंहितेची ऐसी की तैसी
विभागीय आयुक्त कार्यालयात माघारीच्या निमित्ताने आचारसंहितेचा पावलोपावली भंग करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकाºयाच्या स्वीय सहायकाच्या समोर बसून भाजपाचे पदाधिकारी राजकीय चर्चा करण्यात व्यस्त होते, तर याच ठिकाणी बसून प्रतापदादा सोनवणे यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माघारीबाबत भ्रमणध्वनीवरून संवाद साधत होते. माजी मंत्री विजय नवल पाटील व प्रतापदादा सोनवणे यांच्यातील बैठकदेखील विभागीय आयुक्त कार्यालयातच झडल्याने साºयाच राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू विभागीय आयुक्त कार्यालय झाले होते. याठिकाणी उघड उघड आचारसंहिता भंग होत असताना त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या विभागीय आयुक्त कार्यालयाने मात्र ‘नरो वा कुंजरोवा’ची भूमिका घेतली.
बुद्धीला जे पटले तेच केले : सोनवणे
भाजपाचे बंडखोर माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी ‘बुद्धीला जे पटले तेच केले’ असे सांगून निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले. भाजपातील जुने मित्र, सहकारी उमेदवारी मागे घेण्यासाठी विनंती करण्यास आले होते. मुख्यमंत्र्यांचा फोन हवापाणी विचारण्यासाठी आल्याचे ‘मार्मिक’ उत्तर सोनवणे यांनी दिले, तर आमदार बाळासाहेब सानप यांनी आम्ही किती जणांची माघारी झाली याची माहिती घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. योगायोगाने कार्यालयाच्या आवारात सोनवणे यांची भेट झाल्यानंतर त्यांना तुम्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात म्हणून उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती केल्याचे सानप यांनी सांगितले.
आठ जणांची माघार
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे प्रकाश हिला सोनवणे, दिनेश अभिमन्यू देवरे, सुरेश पांडुरंग पाटील, सुनील धोंडू फरस, महेश भिका शिरुडे, सुनील रमेश बच्छाव, कुणाल नरेंद्र दराडे, गजानन काशीराम खराटे या आठ जणांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. मनसेचे सोनवणे यांना २००६च्या निवडणुकीत दुसºया क्रमांकाची मते मिळाली होती.