ईदचे नमाजपठण घरांमध्येच करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:11 AM2021-07-18T04:11:58+5:302021-07-18T04:11:58+5:30
येत्या बुधवारी (दि.२१) शहर व परिसरात मुस्लीम बांधवांकडून बकरी ईद साजरी पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ...
येत्या बुधवारी (दि.२१) शहर व परिसरात मुस्लीम बांधवांकडून बकरी ईद साजरी पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.१७) शांतता समिती सदस्यांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला मुंबईनाका, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर पोलीस ठाण्यांतर्गत सहायक आयुक्त दीपाली खन्ना यांनी बैठक घेतली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह मनपा आरोग्य विभागाचे अधिकारी, विविध मशिदींचे मौलवी, मदरशांचे तसेच धार्मिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नसल्याने सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. यावेळी बैठकीत झालेल्या चर्चेनुसार तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या स्लॉटर हाउसच्या ठिकाणी सुरक्षा व स्वच्छतेची सर्व खबरदारी घेत मुबलक पाण्याची व्यवस्था करण्यावर प्रत्येकाने भर द्यावा. तसेच सार्वजनिक स्वरूपात नमाजपठणाकरिता कोठेही एकत्र जमू नये, असेही खन्ना यांनी यावेळी सांगितले. मशिदींमध्ये केवळ मुख्य मौलवींसह पाच प्रमुख लोकांना नमाजपठण करण्याची परवानगी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जनावरे खरेदी-विक्रीचे व्यवहारासाठी बाजार भरविण्यावरही बंदी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी मौलाना हाजी जाहीद, मौलाना कारी रईस, रजा अकादमीचे एजाज रजा मकरानी, मदरसा सादिकुल उलुमचे विश्वस्त हाजी युनूस रजवी, सलीम चौधरी, प्रसन्ना तांबट, ॲड. नाजीम काजी आदी उपस्थित होते.