प्रार्थना सुरु असताना फादरने चर्चमध्ये घेतले स्वत:ला पेटवून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 01:46 AM2021-12-20T01:46:06+5:302021-12-20T01:46:44+5:30
‘ख्रिसमस’चा सण अवघ्या पाच ते सहा दिवसांवर येऊन ठेपला असून, सर्वत्र जय्यत तयारी सुरु असताना नाशिक शहरातील एका चर्चमध्ये चक्क धर्मगुरु फादर अनंत पुष्पाकर आपटे (६१) यांनी त्यांच्या वरिष्ठ धर्मगुरु फादरच्या जाचाला कंटाळून स्वत:ला पेटवून घेतले. हा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. १९) चर्चमध्ये साप्ताहिक प्रार्थना सुरु असताना घडला.
नाशिक : ‘ख्रिसमस’चा सण अवघ्या पाच ते सहा दिवसांवर येऊन ठेपला असून, सर्वत्र जय्यत तयारी सुरु असताना नाशिक शहरातील एका चर्चमध्ये चक्क धर्मगुरु फादर अनंत पुष्पाकर आपटे (६१) यांनी त्यांच्या वरिष्ठ धर्मगुरु फादरच्या जाचाला कंटाळून स्वत:ला पेटवून घेतले. हा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. १९) चर्चमध्ये साप्ताहिक प्रार्थना सुरु असताना घडला.
शालिमार येथील वावरे गल्लीच्या प्रारंभी सेंट थॉमस चर्च आहे. या चर्चमध्ये रविवारी नेहमीप्रमाणे प्रार्थनेसाठी समाजबांधव एकत्र जमले होते. यावेळी फादर शरद गायकवाड, फादर अनंत आपटे यांच्यासह विविध धर्गगुरु व चर्च कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अचानकपणे फादर आपटे यांनी चर्चमध्ये स्वत:ला पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.
हा प्रकार यावेळी जमलेल्या नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्वरित आगीच्या विळख्यात सापडलेल्या आपटे यांची चर्चमधील कार्पेटच्या सहाय्याने सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत आपटे हे दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत कमरेपासून खाली भाजले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वरिष्ठ धर्मगुरुंच्या कारवाईमुळे आणि सेंट थॉमस चर्चच्या कमिटीकडून करण्यात आलेल्या विविध खोट्या आरोपांमुळे त्रस्त होत आपटे यांनी अशा प्रकारे टोकाची भूमिका घेतली, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
---कोट---
माझ्यावर मोठा अन्याय झाला आहे. माझे मोठे धर्मगुरु रेव्हरन्ट शरद गायकवाड यांनी माझे म्हणणे ऐकून न घेता कामाला स्थगिती दिली. कमिटीकडून वारंवार शारीरिक, मानसिक त्रास दिला जात होता. दोन वर्षांपासून हा सगळा त्रास मी सहन करत असताना गायकवाड यांनी न्याय दिला नाही. त्यामुळे मी सेंट थॉमस चर्चमध्येच आत्मदहनाचा प्रयत्न केला. यापूर्वी मी वरिष्ठ धर्मगुरु गायकवाड यांना भेटून चर्चा केली. मात्र, त्यांनी माझे काहीही ऐकून न घेता ‘तुला काय करायचे ते कर’ असे सांगितले. त्यामुळे मी स्वत:ला पेटवून घेतले.
- फादर अनंत आपटे.