देशभरातील भाविकांची प्रार्थना
By admin | Published: February 12, 2017 12:22 AM2017-02-12T00:22:51+5:302017-02-12T00:23:01+5:30
बाळ येशू यात्रोत्सव : मंदिरात दीड दिवसाच्या जन्मोत्सवाला प्रारंभ
उपनगर : नाशिक-पुणे महामार्गावरील नेहरूनगर येथील बाळ येशू मंदिराच्या दीड दिवसाच्या यात्रा उत्सवाला शनिवारी उत्साहात प्रारंभ झाला. दिवसभर झालेल्या सामूहिक मिस्सा प्रार्थनेमध्ये देशाच्या व राज्याच्या विविध भागातून पन्नास हजाराहून अधिक ख्रिस्तीबांधव सहभागी झाले होते.
नेहरूनगर येथील बाळ येशू मंदिराच्या दीड दिवसाच्या यात्रोत्सवास शनिवारी सकाळी प्रारंभ झाला. सकाळी ६ वाजेपासून प्रत्येक तासाला सेंट झेवियर शाळेच्या प्रांगणात उभारलेल्या भव्य सभा मंडपात विविध ख्रिस्ती धर्मगुरूंच्या मार्गदर्शनाखाली मराठी, इंग्रजी व तामीळ भाषेतून सामूहिक प्रार्थना म्हणण्यात आली. तसेच बाळ येशू मंदिरात दर्शनासाठी तसेच नवसपूर्तीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
दिवसभर झालेल्या सामूहिक मिस्साबली प्रार्थना सभांमध्ये फादर ट्रेव्हर मिरांडा, फादर लिनस डिमेलो, सेड्रीक रिबेलो, जोईल नोरान्हा, विन्सी डिमेलो, रॉबर्ट पेन, विन्संट वाझ, टोनी डिसूझा, लिरॉय रॉड्रीक्स, ख्रिस्तोफर जयकुमार, फ्रान्सिस फर्नांडिस, स्टिफन घोसाल, ब्रिमॉन डिसूझा, बॅप्टीस पिन्टो, डियॉन लोबो आदिंसह विविध धर्मगुरूंनी भाविकांना मार्गदर्शन केले.
बाळ येशूच्या यात्रेनिमित्त देश व राज्याच्या विविध भागातून ५० हजाराहून अधिक ख्रिस्तीबांधव उपस्थित होते. यात्रोत्सवानिमित्त बाळ येशू मंदिराच्या दुतर्फा पूजासाहित्य, रंगीबेरंगी मेणबत्त्या, मेणाचे पुतळे, फळ, मिठाई, खेळणी, खाद्यपदार्थांची आदि विविध दुकाने थाटण्यात आली होती. नेहरूनगर, जयभवानी रोड, उपनगर ते घंटी म्हसोबा मंदिर या परिसरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात वाहने उभी केल्याने या परिसरास वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले होते. तसेच महामार्गावर भाविकांबरोबरच इतर वाहनांच्या गर्दीमुळे सायंकाळी उशिरापर्यंत संथगतीने वाहतूक सुरू होती. पोलिसांना वाहतुकीची कोंडी सोडवताना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत होती. रविवारी सकाळी सहा वाजेपासून ते दुपारी १२ वाजेपर्यंत सामूहिक मिस्साबली प्रार्थना होऊन यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
चोरांचा उपद्रव
यात्रोत्सवाला झालेल्या गर्दीमुळे भुरट्या चोरांनी अनेक भाविकांना आपला हात दाखवला. अनेकांचे मोबाइल, पैशाचे पाकिट, पर्समधील पैसे, मौल्यवान वस्तू चोरीस गेल्याने भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला. (वार्ताहर)