घराघरांत नमाजपठण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 12:27 AM2020-05-26T00:27:14+5:302020-05-26T00:28:11+5:30
यावर्षी रमजान पर्वासह ईदवर कोरोनाचे सावट असल्यामुळे सोमवारी (दि.२५) रमजान ईद सण शहरात अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे गजबजणारे ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदान यंदा ओस पडलेले दिसून आले. सामूहिक नमाजपठणाचा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून रद्द करण्यात आला. नागरिकांनी आपापल्या घरांमध्येच नमाज, फातिहापठण करून साधेपणाने ईद साजरी केली.
नाशिक : यावर्षी रमजान पर्वासह ईदवर कोरोनाचे सावट असल्यामुळे सोमवारी (दि.२५) रमजान ईद सण शहरात अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे गजबजणारे ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदान यंदा ओस पडलेले दिसून आले. सामूहिक नमाजपठणाचा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून रद्द करण्यात आला. नागरिकांनी आपापल्या घरांमध्येच नमाज, फातिहापठण करून साधेपणाने ईद साजरी केली.
‘ईद उल फित्र’ अर्थात रमजान ईद आज सर्वत्र साजरी झाली, मात्र कोरोनासारख्या महाभयंकर अशा संसर्गजन्य आजारामुळे यंदा समाज बांधवांनी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत फिजिकल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन केले. सामूहिक नमाजपठण टाळत नागरिकांनी घरांमध्येच नमाज अदा केली.
ईदगाहकडे जाणाऱ्या रस्त्यांवर कमालीचा शुकशुकाट जाणवत होता. शहरासह सर्वच उपनगरांमध्येही लॉकडाउन नियमांचे व जमावबंदी, संचारबंदी कायद्याचे पूर्णपणे पालन करण्यात आले. कुठल्याही मशिदीच्या आवारात समाजबांधव जमले नाही. सकाळी सात वाजता सर्वच उपनगरीय मशिदींमधून धर्मगुरूंनी ध्वनिक्षेपकांद्वारे ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या. तसेच घरांमध्ये कोणत्या नमाजचे व कसे पठण करावे, याबाबत माहिती समजावून देत सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. यामुळे सकाळी मुस्लीम बहुल भागातसुद्धा लगबग दिसून आली नाही. युवकांनीही धर्मगुरूंच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. मुस्लीम बहुल भागात सर्वत्र शांततेत आणि साधेपणाने ईद सण साजरा करण्यात आला.
एकमेकांना शुभेच्छा देताना फिजिकल डिस्टनच्या नियमांचे पालन करण्यात आले. बाजारपेठेतही नेहमीपेक्षा खरेदीला फारशी गर्दी दिसून आली नाही. एकमेकांच्या घरी जाऊन अनेकांनी शिरखुर्म्याचा आस्वादही घेतला.
मशिदीही ‘लॉकडाउन’
ईदगाह मैदानासह सर्वच मुस्लीमबहुल भागासह उपनगरांमधील लहान-मोठ्या मशिदी मागील दोन महिन्यांपासून ‘लॉकडाउन’ आहेत. ईदच्या दिवशीही मशिदींमध्ये कोणीही सामूहिक नमाजपठणाकरीता गर्दी केली नसल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी समाजबांधवांनी आपापल्या घरांमध्ये ईद साजरी केली.
दरवळला शिरखुर्म्याचा सुगंध
रमजान ईद म्हटली की शिरखुर्मा हे खास खाद्यपदार्थ सर्वांच्याच पसंतीचे. ईदच्या औचित्यावर मुस्लीम बहुल भागात दुधात सुकामेवा टाकून तयार करण्यात आलेल्या शिरखुर्म्याचा सुगंध दरवळला होता. समाज बांधवांनी एकमेकांच्या घरी जाऊन ईदनिमित्त शिरखुर्म्याचा आस्वाद अपवादानेच घेतला.
‘डिस्टन्स’ राखून दिल्या शुभेच्छा
ईदच्या शुभेच्छा म्हणजे गळाभेट आणि हस्तांदोलन असे समीकरण ठरलेले, मात्र यावर्षी कोरोनाचे संक्रमण टाळण्याकरिता शक्यतो समाज बांधवांनी परस्परांमध्ये ‘डिस्टन्स’ राखूनच एकमेकांना ‘ईद मुबारक’ म्हणत शुभेच्छा दिल्या.