मालेगावी घरातच नमाज पठण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 01:40 PM2021-05-14T13:40:50+5:302021-05-14T13:41:04+5:30
मालेगाव : शहर व परिसरात शुक्रवारी कोरोनाच्या सावटाखाली रमजान ईद साजरी करण्यात आली.
ईदगाह मैदानावर शुकशुकाट : कडेकोट पोलीस बंदोबस्त, कोरोनाच्या सावटाखाली रमजान ईद साजरी
मालेगाव : शहर व परिसरात शुक्रवारी कोरोनाच्या सावटाखाली रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लीम बांधवांनी घरातच नमाज व दुआ पठण करून, जगावर आलेले कोरोना महामारीचे संकट दूर होऊ दे, अशी प्रार्थना करीत रमजान ईद साजरी केली. राज्य शासनाने सामूहिक नमाज पठणाला बंदी घातली होती. स्थानिक प्रशासनाने ही मुस्लीम बांधवांनी घरातच नमाज अदा करावी, असे आवाहन केले होते. या आवाहनाला सलग दुसऱ्या वर्षी मालेगावकरांनी प्रतिसाद देत, मुस्लीम बांधवांनी संयम दाखवत, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही घरातच नमाज अदा केली. शहरात चंद्रदर्शन झाल्यानंतर चैतन्याचे उत्साहाचे वातावरण दिसून आले. मुस्लीम बांधवानी एकमेकांना अलिंगन देत, चांद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या. शुक्रवारी सकाळी काही मुस्लीम बांधवांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रार्थनास्थळामध्ये नमाज पठण केले जगावर आलेले कोरोना महामारीचे संकट दूर व्हावे, देशात शांतता नांदावी, कोरोना महामारीतून मुक्तता मिळावी, बाधित रुग्णांची प्रकृती चांगली व्हावी, अशी प्रार्थना विविध प्रार्थनास्थळांमधून करण्यात आली. येथील पोलीस कवायत मैदानावरील ईदगाहकडे जाणारे रस्ते बॅरिकॅटिंग लावून रस्ते अडविण्यात आले होते. ईदगाह मैदानाकडे जाणाऱ्या कॅम्प रोड, मोसम पूल, सटाणा नाका, एकात्मता चौक, कॉलेज रोड परिसरात लोखंडी जाळ्या लावून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. परिणामी, मैदानावर शुकशुकाट दिसून आला, तर महापालिकेने शहरात स्वच्छता व पाणीपुरवठा सुरळीत होईल, यासाठी विशेष काळजी घेतली होती. गेल्या महिनाभरापासून नियमित नमाज, रोजे, नमाज पठण, विशेष तरावीहचे नमाज पठण अशा दिनचर्यामुळे पूर्वभागात उत्साहाचे वातावरण होते. रमजान ईद सर्वात मोठा सण आहे. ईदच्या नमाजानंतर मुस्लीम बांधवांनी एकमेकांना अलिंगन ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील पूर्व भागात दिवसभर उत्साहाचे नवचैतन्याचे वातावरण दिसून आले. पोलिसांनीही चौकाचौकात कडक बंदोबस्त ठेवला होता. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पोलीस उपाधीक्षक लता दोंदे यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले होते.
-----------------------
अक्षय तृतीयेचा सण पारंपरिक पद्धतीने साजरी
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा अक्षय तृतीया सण मालेगाव शहर व परिसरात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोनाच्या संकटामुळे अक्षय तृतीया सणावर विरजन आले असले, तरी नागरिकांनी घरात घागर पूजन व इतर पूजाविधी करून घेतला. कोरोनामुळे पाहुण्यांची गर्दी दिसले नाही, तरी घरातल्या घरात नागरिकांनी अक्षय तृतीयेचा सण साजरा करून कोरोनाचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना देवाकडे केली आहे.