निवडणूक, दुष्काळ निवारणाला प्राधान्य : सुरज मांढरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 06:29 PM2019-03-13T18:29:27+5:302019-03-13T18:29:51+5:30
लोकमत न्युज नेटवर्क नाशिक : नूतन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कामकाजाला प्रारंभ केला असून, सध्या निवडणुकीचा ...
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : नूतन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कामकाजाला प्रारंभ केला असून, सध्या निवडणुकीचा काळ पाहता आगामी काळात लोकसभा निवडणुकीची तयारी व दुष्काळ निवारण या दोन्ही गोष्टींना अधिक प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदावरून नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झालेल्या मांढरे यांचे मंगळवारी रात्रीच नाशकात आगमन झाले. सकाळी साडेदहा वाजता त्यांनी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यापुढील महत्त्वाचे विषय जाणून घेतानाच लोकसभा निवडणुकीची तयारी जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य सरकारच्या सेवेत २९ वर्षे गेली असल्यामुळे कोणताही विषय आपल्यासाठी नवीन नसल्याचे सांगून, सध्याची परिस्थिती पाहता, तोंडावर आलेली लोकसभा निवडणूक व जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून या दोन्ही विषयांना आपण प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. ‘सेवा हमी कायद्या’ची काटेकोर अंमलबजावणीला आपण प्राधान्य देणार असून, कोणताही विषय वा प्रश्न सोडवणुकीसाठी किती वेळ लागेल याची मर्यादा सर्वांना ठरवून द्यावी लागेल, असे सांगून पुणे येथे २५७ सुविधा आपण जनतेला उपलब्ध करून दिल्या होत्या. त्याचबरोबर ‘पब्लिक डिलिव्हरी सिस्टीम’अधिकाधिक बळकट करण्याबरोबरच, डिजिटलायझेशन व सरकारी यंत्रणेकडे कामे घेऊन येणाऱ्या सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी ‘व्हिजिटर ट्रॅक’पद्धत लागू करण्यात येईल, त्याचबरोबर त्यांचे समाधान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्मिती करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. लवकरच प्रत्येक खाते प्रमुखाची बैठक घेऊन त्यांच्याकडील कामे जाणून घेण्याबरोबरच, कर्मचाऱ्यांकडूनही आपण माहिती घेणार असून, ज्यांच्याकडे निवडणुकीचे काम नसेल अशांनी निवडणूक कामाच्या आड दैनंदिन कामे नाकारू नये अशा सूचना आपण अधिकाºयांना दिल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले. यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, तहसीलदार प्रशांत पाटील उपस्थित होते.