मान्सूनपूर्व सरींनी शहराला झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:12 AM2021-05-31T04:12:10+5:302021-05-31T04:12:10+5:30
ढगांच्या गडगडाट अन् विजांच्या कडकडाटात पावसाच्या सरींनी रविवारी सलामी दिली. दुपारी चार वाजल्यापासून शहर व परिसरात ढगाळ हवामान तयार ...
ढगांच्या गडगडाट अन् विजांच्या कडकडाटात पावसाच्या सरींनी रविवारी सलामी दिली. दुपारी चार वाजल्यापासून शहर व परिसरात ढगाळ हवामान तयार होण्यास सुरुवात झाली होती. सायंकाळी पाच वाजेपासून पावसाला सुरुवात झाली. शरणपूर रोड, कॉलेज रोड, सिडको, सातपूरसह पंचवटी, नाशिक रोड, इंदिरानगर, गंगापूर रोड भागाला पावसाने झोडपले. रविवारची सुटी आणि कोरोनाचे निर्बंध यामुळे शहरातील रस्त्यांवर तसा शुकशुकाटच होता. नोकरदारांचीही फारशी रेलचेल नव्हती. संध्याकाळी पाच वाजता दमदार सरींचा धुव्वाधार वर्षाव सुरू झाला. ढगांचा गडगडाट अन् विजांचा कडकडाटाने शहरवासीय हादरले. सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसाने रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते. उंच-सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. स्मार्टसिटीअंतर्गत शहर व परिसरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांच्या ठिकाणी त्रेधातिरीपिट उडाल्याचे दिसून आली. कामगारांना हातातील काम सोडून आडोशाला जावे लागले.
---इन्फो--
तापमानाचा पारा ३४ अंश तर आर्द्रता ९८ टक्के
रात्री उशिरापर्यंत काही उपनगरांमध्ये तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातसुद्धा हलक्या सरींचा वर्षाव सुरुच होता. तसेच ढगाळ हवामानही कायम होते. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याचा अनुभव नाशिककरांना आला असला तरी कमाल तापमानाचा पारा शहरात रविवारी ३४.४ अंशांपर्यंत पोहोचल्याची नोंद झाली. यासोबतच संध्याकाळी वातावरणात आर्द्रतेचेही प्रमाण वाढलेले दिसून आली. ९८ टक्के इतकी आर्द्रता मोजली गेली.
---इन्फो--
पुढील चार दिवस सरींची शक्यता
भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेला अंदाज खरा ठरला. मान्सूनपूर्व सरींनी शहरासह ग्रामीण भागाला शनिवार व रविवारी झोडपून काढले. येत्या १० जूनपर्यंत कोकणात मान्सून प्रवेश करणार आहे. पुढील चार दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व सरींचा वर्षाव होण्याची शक्यता वर्तविली गेली आहे.