मान्सुनपुर्व सरींनी शहराला झोडपले; तीस मिनिटांत १९.४मिमीपर्यंत पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 08:02 PM2021-05-30T20:02:19+5:302021-05-30T20:05:23+5:30
रविवारची सुटी आणि कोरोनाचे निर्बंध यामुळे शहरातील रस्त्यांवर तसा शुकशुकाटच होता. नोकरदारांचीही फारशी रेलचेल नव्हती. संध्याकाळी पाच वाजता दमदार सरींचा धुव्वाधार वर्षाव सुरु झाला. ढगांचा गडगडाट अन् वीजांचा कडकडाटाने शहरवासीय हादरले.
नाशिक : दोन दिवसांपासून वातावरणात वाढणारा उकाडा आणि कमाल तापमानाचा चढता पारा यामुळे नाशिककर घामाघुम झाले होते. रविवारच्या सुटीचा आपापल्या घरात आनंद लुटत असताना संध्याकाळी मान्सुनपुर्व सरींनी जोरदार हजेरी लावल्याने नाशिककरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. सुमारे अर्धा तास शहरासह उपनगरांमध्ये पाऊस झाला. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत १९.४मि.मी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली.
ढगांच्या गडगडाट अन् विजांच्या कडकडाटात पावसाच्या सरींनी रविवारी सलामी दिली. दुपारी चार वाजेपासून शहर व परिसरात ढगाळ हवामान तयार होण्यास सुरुवात झाली होती. सायंकाळी पाच वाजेपासून पावसाला सुरुवात झाली. शरणपूररोड, कॉलेजरोड, सिडको, सातपूरसह पंचवटी, नाशिकरोड, इंदिरानगर, गंगापूर रोड भागाला पावसाने झोडपले. रविवारची सुटी आणि कोरोनाचे निर्बंध यामुळे शहरातील रस्त्यांवर तसा शुकशुकाटच होता. नोकरदारांचीही फारशी रेलचेल नव्हती. संध्याकाळी पाच वाजता दमदार सरींचा धुव्वाधार वर्षाव सुरु झाला. ढगांचा गडगडाट अन् वीजांचा कडकडाटाने शहरवासीय हादरले. सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसाने रस्त्यांवरुन पाण्याचे पाट वाहू लागले होते. उंचसखल भागात पावसाचे पाणी साचले होते. स्मार्टसिटीअंतर्गत शहर व परिसरात ठिकठिकाणी सुरु असलेल्या विकासकामांच्या ठिकाणी त्रेधातिरिपिट उडाल्याचे दिसून आली. कामगारांना हातातील काम सोडून आडोशाला जावे लागले.
तापमानाचा पारा ३४ अंश तर आर्द्रता ९८ टक्के
रात्री उशिरापर्यंत काही उपनगरांमध्ये तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातसुध्दा हलक्या सरींचा वर्षाव सुरुच होता. तसेच ढगाळ हवामानही कायम होते. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याचा अनुभव नाशिककरांना आला असला तरी कमाल तापमानाचा पारा शहरात रविवारी ३४.४ अंशापर्यंत पोहचल्याची नोंद झाली. यासोबतच संध्याकाळी वातावरणात आर्द्रतेचेही प्रमाण वाढलेले दिसून आली. ९८ टक्के इतकी आर्द्रता मोजली गेली.
--