सुटीपूर्वी शाळांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी
By admin | Published: October 25, 2016 01:52 AM2016-10-25T01:52:33+5:302016-10-25T01:53:26+5:30
उपक्रम : सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने आदिवासी पाड्यांवर फराळाचे वाटप
नाशिक : शहर व परिसरातील अनेक शाळांना दिवाळीची सुटी लागली असून, त्यापूर्वीच विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात प्रदूषणमुक्त दिवाळी सण साजरा केला. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या विविध शाळांमध्ये दिवाळीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील मुलांना खाऊ व फराळाचे वाटप करण्यात आले. जाणीव प्रतिष्ठान जाणीव संस्थेतर्फे एकदरापाडा येथील आदिवासी बांधवांसोबत दीपावलीनिमिताने आनंदोत्सव साजरा करून आपल्या वंचित बांधवांसोबत वीण घट्ट करण्याचा प्रयत्न केला. संस्थेच्या वतीने यावर्षी यासोबतच स्त्रीभ्रूण हत्त्या, शिक्षण, आरोग्य, विविध सरकारी योजना, व्यसनमुक्ती या विषयांवर प्रबोधन करण्यात आले. तसेच एकदरा पाड्यातील काही हुशार आणि होतकरू मुला-मुलींचा शैक्षणिक खर्च संस्थेतर्फे केला जाणार आहे. याप्रसंगी संचालक अभिजीत दीघावकर, प्रशांत भामरे, मनोज गांगुर्डे, पराग चव्हाण, अविराज बच्छाव, अमोल देशमुख, रवी सूर्य, किरण गवारे, कुणाल सोनवणे उपस्थित होते. गौळीपाडा येथे फराळाचे वाटप दिंडोरीरोडवरील मेरी, म्हसरूळ परिसरातील एबीपी सोशल आॅर्गनायझेशनच्या वतीने दिंडोरी तालुक्यातील गौळीपाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू, तर पाड्यावरील ग्रामस्थांना फराळ, कपडे व औषधांचे वाटप करण्यात आले. आदिवासी भागातील नागरिकांची तसेच विद्यार्थ्यांची परिस्थिती बिकट असल्याने एबीपी सोशल आॅर्गनायझेशनच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष राहुल पवार यांनी हा उपक्रम राबविला. संस्थेने राबविलेल्या उपक्रमाबद्दल ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करून संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विद्यार्थी व ग्रामस्थांनी संस्थेचे पवार यांचा सत्कार केला. पवार यांनी विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मदत म्हणून सर्वांनी पुढे येऊन मदत करावी असे आवाहन केले. यावेळी प्रणव कर्नाटकर, जितू राजपूत, किरण काकड, आकाश ब्राह्मणकर, हर्षद कुलकर्णी, प्रवीण देशमुख, रवि आढाव, जयसिंग चौधरी, अतुल वाघ, अभिषेक आडके, शरद ओझरकर, मयूर लोखंडे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)