निर्बंध शिथिलतेनंतर व्यवहार पूर्वपदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:18 AM2021-06-09T04:18:27+5:302021-06-09T04:18:27+5:30
नाशिक : जिल्ह्यात अनलाॅकच्या पहिल्या दिवशी बाजारपेठांमध्ये गर्दी झाल्याने सर्व व्यवहार पूर्वपदावर आले, तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येदेखील ...
नाशिक : जिल्ह्यात अनलाॅकच्या पहिल्या दिवशी बाजारपेठांमध्ये गर्दी झाल्याने सर्व व्यवहार पूर्वपदावर आले, तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येदेखील मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. दळणवळणाची साधने सुरू झाल्याने तालुका पातळीवर बाजारांनादेखील चालना मिळाली आहे. नाशिक शहरातील बाजारपेठांमध्ये सायंकाळपर्यंत गर्दी झाली होती.
नाशिक जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील दुकाने तसेच आस्थापना सायंकाळी चार वाजेपर्यंत खुली झाली आहेत. त्यामुळे बाजारपेठांमध्ये सकाळपासूच गर्दी दिसून आली. सोमवापासून जिल्ह्यातील बसेसची सेवादेखील सुरू झाल्याने बसस्थानकांवर दोन महिन्यांनंतर प्रवासी परतले असून स्थानकांवर तुरळकच गर्दी झाली होती. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बाजारपेठांमधील दुकानांमध्ये गावखेड्यातील ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती.
अनलॉकच्या पहिल्या दिवशी अनेक गावांमध्ये लग्नाचादेखील बार उडाला. अनेक ठिकाणी पोलिसांनी गर्दी जमविल्याच्या कारणांवरून वधू-वर पित्यांवर दंडात्मक कारवाईदेखील केली. नाशिक शहरातील सराफा बाजारात मेाठ्या प्रमाणात उलाढाल झाली. लग्नसराई असल्याने सोने खरेदीलादेखील प्राधान्य देण्यात आले. सिन्नर, दिंडोरी, गोंदे येथील औद्योगिक वसाहतींमध्ये यंत्राची चाके फिरू लागली आहेत. लॉकडाऊनमुळे इतके दिवस ओस पडलेल्या रस्त्यांवरील वर्दळ वाढू लागल्याने छोट्यामोठ्या उद्योग, व्यवसायांनादेखील चालना मिळाली आहे.