पोलिसांकडून महिलांना सावधगिरीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:29 AM2019-06-17T00:29:35+5:302019-06-17T00:29:51+5:30
पारंपरिक प्रथेनुसार वटपौर्णिमेनिमित्ताने सुवासिनी महिला साजशृंगार करून वटवृक्षाच्या पूजेसाठी घराबाहेर पडल्या होत्या.
नाशिक : पारंपरिक प्रथेनुसार वटपौर्णिमेनिमित्ताने सुवासिनी महिला साजशृंगार करून वटवृक्षाच्या पूजेसाठी घराबाहेर पडल्या होत्या. दरम्यान, महिलांच्या दागिन्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहर व परिसरात वटवृक्षांजवळ तसेच विविध उद्यानांच्या परिसरात संबंधित पोलीस ठाण्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून प्रबोधन केले जात होते. तसेच दागिन्यांच्या सुरक्षिततेसाठी विविध सूचनाही पोलिसांनी महिलांना दिल्या. त्यामुळे दिवसभरात कोठेही दागिने चोरीची घटना घडल्याचे समोर आले नाही.
वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने शहर व परिसरातील विविध भागांमध्ये वटवृक्षाच्या पूजेसाठी महिला मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. दरम्यान, पोलिसांनी यावेळी महिलांशी संवाद साधत खबरदारीचे उपाय सुचविले. दागिन्यांची सुरक्षा कशी घ्यावी, चोरट्यांपासून स्वत:सह दागिन्यांना कसे सुरक्षित ठेवावे, संशयास्पद युवकांच्या हालचाली कशा टिपाव्या याबाबत सूचना देत पोलिसांनी सावधगिरीचा इशारा दिला.