मुसळधार : सायंकाळनंतर तीन तासांत ३४.मि.मी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 09:29 PM2019-10-05T21:29:49+5:302019-10-05T21:32:32+5:30
शनिवारी सायंकाळी ६ ते रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाला. मध्यम स्वरूपाच्या वेगवान सरींचा वर्षाव सुमारे पाऊण तास सुरू होता.
नाशिक : शहराला परतीच्या पावसाने शनिवारी (दि.५) पुन्हा मेघगर्जनेसह झोडपून काढले. सायंकाळी ६ वाजेपासून सुमारे तासभर चाललेल्या जोरदार पावसाने घरी परतणाऱ्या नोकरदारांसह रस्त्यांवरील विक्रेत्यांची त्रेधातीरपीट उडाली. सायंकाळी तीन तासांत ३४ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली. जून ते सप्टेंबरपर्यंत एकूण १ हजार २३४ मि.मी इतका पाऊस पडला असून गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा शहरासह जिल्ह्यात दुप्पट पाऊस झाला.
मागील दोन दिवसांपासून हलक्या सरींचा काही मिनिटे शहरात दुपारनंतर वर्षाव होत होता. गुरुवारपासून पावसाने दोन दिवस विश्रांती घेत शनिवारी सायंकाळी ६ ते रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाला. मध्यम स्वरूपाच्या वेगवान सरींचा वर्षाव सुमारे पाऊण तास सुरू होता. शहरातील गंगापूररोड, कॉलेजरोड, शरणपूररोड, सीबीएस, रविवारकारंजा, मेनरोड, भद्रकाली, जुने नाशिक, द्वारका, मुंबईनाका, तिडके कॉलनी या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये इंदिरानगर, वडाळागाव, नाशिकरोड, पाथर्डीफाटा, अंबड या भागांतही हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरींचा कमी-अधिक प्रमाणात वर्षाव झाला.
शनिवारी दिवसभर प्रखर ऊन शहर व परिसरात पडले होते. यामुळे दुपारपासून वातावरणात कमालीचा उष्मा वाढला होता. नाशिककर घामाघूम झाले होते. दुपारी ४ वाजेनंतर शहरात ढगाळ हवामान तयार होऊन काही प्रमाणात अल्पवेळ थंड वारा सुटल्याने हलकासा दिलासा जाणवला. सायंकाळी ६ वाजेपासून जोरदार सरी कोसळू लागल्याने मात्र नाशिककरांची वाढत्या उकाड्यापासून सुटका झाली. सायंकाळी तासभर सुरू असलेल्या पावसामुळे कालिका देवी यात्रोत्सवात आलेल्या भाविकांची धावपळ उडाली. तसेच विक्रेत्यांचेही हाल झाले. विक्रीसाठी आणलेला विविध प्रकारचा माल आवरताना विक्रेत्यांची दमछाक झालेली दिसून आली. अचानकपणे आलेल्या जोरदार पावसामुळे कालिका यात्रोत्सवात अखेरच्या टप्प्यात होणारी शनिवारच्या सुटीच्या गर्दीवरही परिणाम झाल्याचे जाणवले. तसेच गोदावरीच्या पात्रातही पाणी वाढल्याचे दिसून आले.