इगतपुरीच्या पूर्व भागात पावसाचा हाहाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 02:12 PM2019-09-26T14:12:39+5:302019-09-26T14:13:18+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पुर्व भागात गुरूवारी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून जणू काही ढगफूटीप्रमाणे तीन ते चार तासापासून पडलेल्या जोरदार पावसामुळे अस्वली स्टेशन, नांदूरवैद्य या परिसरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पुर्व भागात गुरूवारी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून जणू काही ढगफूटीप्रमाणे तीन ते चार तासापासून पडलेल्या जोरदार पावसामुळे अस्वली स्टेशन, नांदूरवैद्य या परिसरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली. या पावसामुळे अस्वली स्टेशनमध्ये पुराचे पाणी घुसल्याने येथील नागरिकांचे हाल झाले असून पुराचे पाणी घरांमध्ये घुसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. इगतपुरीच्या पूर्व भागात असलेल्या अस्वली स्टेशन, नांदूरवैद्य, नांदगाव बुद्रुक, बेलगाव कुर्हे, गोंदे दुमाला, जानोरी आदी भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. या पावसाने अक्षरश: दाणादाण उडवून दिली आहे. अस्वली व नांदूरवैद्य परिसरातील नदी, नाले, ओंडओहोळ तुडुंब भरून वाहू लागल्यामुळे येथील जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले आहे.अस्वली स्टेशन येथील रेल्वे स्थानकात व रेल्वे लाईनमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या घोटी तसेच इगतपुरी येथे थांबवण्यात आल्या असून संपूर्ण रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. दुपारी चार वाजेपासून सुरु झालेल्या पावसामुळे येथील परिसर जलमय झाला होता.अस्वली स्टेशन येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने येथील नागरिक भयभीत झाले होते.पावसाने लावलेल्या या जोरदार हजेरीमुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने भाजीपाला, भात, मका, टॉमेटोचे प्रचंड नुकसान झाल्याचे परिसरातील शेतकर्यांनी यावेळी माहीती देतांना सांगितले.नांदूरवैद्य व बेलगाव कुर्हे येथील रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे घोटी तसेच इगतपुरीशी संपर्क तुटला होता.