मानोरी परिसरात अवकाळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 11:11 PM2019-12-26T23:11:44+5:302019-12-26T23:12:47+5:30
कधी कडाक्याचे ऊन ... कधी कडाक्याची थंडी ... कधी ढगाळ वातावरण... तर अचानक अवकाळी पाऊस ... आदी वातावरणातील बदलांमुळे येवला तालुक्यातील मानोरी परिसरातील सर्वसामान्य शेतकरी धास्तावले आहेत.
मानोरी : कधी कडाक्याचे ऊन ... कधी कडाक्याची थंडी ... कधी ढगाळ वातावरण... तर अचानक अवकाळी पाऊस ... आदी वातावरणातील बदलांमुळे येवला तालुक्यातील मानोरी परिसरातील सर्वसामान्य शेतकरी धास्तावले आहेत.
तीन दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असून कधी ढगाळ तर कधी हवेत गारवा आणि धुके निर्माण होत आहे. त्यात भर पडली ती अवकाळी पावसाच्या सरींची. यामुळे द्राक्षांसह इतर पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू झाली आहे. आधीच विविध प्रकारच्या रोगांनी आक्रमण केल्यानंतर पिकांना आता अवकाळीने घेरल्याने शेतकऱ्यांची त्रेधा उडाली आहे. आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
यानंतर या पिकातून उत्पादन खर्च देखील फिटला नसतानाच त्यात पुन्हा अवकाळी पावसाच्या हजेरीने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करीत असल्याचे दिसून येत आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी दिवसातून एक ते दोन औषध फवारणी करत असून रात्रीच्या वेळीसुद्धा औषध फवारणी करण्याची वेळ शेतकºयावर आली असून, दुसरीकडे कांदा पिकावर मावा व खोड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने पिके जगवावीत कशी, हा यक्षप्रश्न शेतकºयांना पडलेला दिसून येत आहे.
नाशिक जिल्ह्याला यंदा आॅक्टोबर महिन्यात एका अवकाळी पावसाने कांद्याच्या रोपांसह अनेक पिकांचे अतोनात नुकसान केले असताना
कांदा लागवडीसाठी रोपांची
वानवा भासत आहे. यंदा कांद्याचे दर हे मागील काही दिवसांपासून तेजीत असल्याने शेतकºयांनी कांदा लागवडीसाठी तीन ते चार वेळेस कांद्याचे रोप तयार करण्याचा प्रयत्न केला, मात्र अवकाळी पावसामुळे शेतकºयांच्या या आशेवर पाणी फेरले असून, यंदा कांदा लागवडीसाठी रोपांची उपलब्धता करणे सर्वसामान्य शेतकºयांना आवाक्याबाहेर झाले आहे.
मिळेल त्या किमतीत कांदा रोपाची खरेदी
कांद्याचे दर टिकून असल्याने कांद्याच्या रोपाला सोन्याचा दर मिळत आहे. मिळेल त्या किमतीत शेतकरीवर्ग कांद्याची रोपे घेऊन कांदा लागवड करीत आहेत. ज्या ठिकाणी कांदा लागवड पूर्ण झाली आहे, अशा ठिकाणीसुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसतो की काय अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत. कांद्याच्या बियाणाला एका पायलीसाठी सात ते आठ हजार रु पये मोजावे लागत असून, महागड्या दराने बी घेऊन कांदा लागवडीकडे शेतकरी वर्ग व्यस्त असताना अवकाळी पावसाची शेतकºयांनी धास्ती घेतली आहे.
द्राक्षबागेला फळ लागले असून, ढगाळ वातावरणामुळे दररोज मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागत आहे. त्यात दोन दिवसांपासून अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने द्राक्षबाग वाचविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अवकाळी पाऊस झाल्यास लाखो रु पयांचा खर्च वाया जाणार असून, शेतकरी वर्ग पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- दत्तात्रय शेळके, द्राक्ष उत्पादक, मानोरी