खरीप हंगामासाठी सोयाबीन, टमाट्याला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 10:27 PM2020-06-05T22:27:05+5:302020-06-06T00:03:40+5:30
दिंडोरी तालुक्यातील सर्वच शेतकरीवर्गाने खरीप हंगामासाठी कंबर कसली असून, या हंगामासाठी सोयाबीन व टोमॅटो पिकाला पसंती दिल्याचे चित्र दिसून येत आहे.
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील सर्वच शेतकरीवर्गाने खरीप हंगामासाठी कंबर कसली असून, या हंगामासाठी सोयाबीन व टोमॅटो पिकाला पसंती दिल्याचे चित्र दिसून येत आहे.
शेतकरी म्हटला की, आपल्याला कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे आपल्या पदरात पडले याकडे सर्वांचे लक्ष असते.
यंदा मात्र बळीराजाचे रब्बी हंगामातील उत्पन्नाचे गणित कोरोनाने थैमान घातल्याने चुकले आहे. त्यामुळे कोणत्याही पिकाला अगोदरचा कालखंड जर सोडला तर हमीभाव मिळाला नाही. सर्वच पिके कवडीमोल भावाने विकावी लागली आहे. आता त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शेतकरी नव्या दमाने तयारीला लागला आहे. कमी भांडवलातून जास्तीत जास्त उत्पन्नाची भर आपणाला कशी मिळेल याकडे बळीराजाकडून आखणी केली जात आहे. त्यासाठी सोयाबीन व टमाटा पिकाला पसंती देऊन चांगले दर्जेदार बियाणांची पारख करून उत्पन्न कसे जास्त घेता येईल यासाठी तयारीला लागला आहे.
तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे, उपविभागीय कृषी अधिकारी के.पी. खैरनार, कृषी अधिकारी एस. एस. वसईकर, डी. आर. नाठे, पंडित कनोर, कृषी सहाय्यक संदीपकुमार बोरवे यांनी सोयाबीन पिकाच्या उत्पन्नाची व त्यांची उगवण क्षमता याविषयी माहिती दिली.
शेतकरीवर्ग यासाठी बियाणे खरेदीला लागला आहे. सोयाबीनच्या जास्त उत्पन्नासाठी दिंडोरी तालुका कृषी विभागाने लखमापूर व परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक कार्यशाळा घेतली होती. यामध्ये खर्चात बचत व्हावी म्हणून त्यांनी आपल्या घरातील सोयाबीन बियाणे वापरण्याअगोदर त्या बियाणांची उगवण क्षमता घरच्या घरी कशी तपासावी याचे मार्गदर्शन करण्यात आले.