जानोरी परिसरात कलिंगड लागवडीला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 05:19 PM2021-01-05T17:19:53+5:302021-01-05T17:20:20+5:30
जानोरी : मागील वर्षी कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने स्थानिक बाजारपेठांवर परिणाम होऊन कलिंगड उत्पादकांना मोठा फटका बसला होता. अनेक शेतकऱ्यांवर रस्त्यावर बसून कलिंगडांची विक्री करण्याची वेळ आली होती. तो तोटा भरून काढण्यासाठी यंदा दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा कलिंगड लागवडीला पसंती दिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
कलिंगड लागवडीसाठी नर्सरीतून तीन रुपये दराने रोपे आणली जात असून, साधारणात: एका एकरासाठी अंदाजे सहा ते साडेसहा हजार रोपांची आवश्यकता भासत आहे. त्यासाठी एकरी १८ ते १९ हजार रुपये रोपांवर खर्च केले जात आहेत, तसेच मल्चिंग पेपर, ठिबक सिंचनासह लागवडीच्या वेळेस विविध प्रकारचे जैविक व रासायनिक खते वापरली जात आहेत. कलिंगड तयार होईपर्यंत एकरी ८० ते ९० हजार रुपये खर्च केला जातो. कलिंगडाची लागवड करताना, दोन रोपांमधील अंतर साधारणपणे एक ते दीड फूट व दोन सऱ्यांमधील अंतर चार फुटांचे असते. कलिंगडाच्या एका वेलीवर जास्तीतजास्त तीन फळांचे नियोजन केले जाते. एका कलिंगडाच्या वेलीपासून साधारणपणे १३ ते १५ किलो माल तयार होत असतो. एका वेलीवर जास्त प्रमाणात कलिंगडाचे फळ धरल्यास वजनात घट येऊन गुणवत्तेवर परिणाम होतो. यासाठी कलिंगड उत्पादक एका वेळीवर तीनपेक्षा जास्त फळे ठेवत नसल्याचे दिसून येत आहे.