ग्रंथप्रदर्शन, साहित्य प्रसारासहपुस्तक प्रकाशनांना देणार प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:27 AM2021-02-21T04:27:44+5:302021-02-21T04:27:44+5:30
नाशिक : साहित्य संमेलनात ग्रंथप्रदर्शन, प्रकाशन आणि साहित्य प्रसाराला पूरक भूमिका घेण्यास प्राधान्य देण्याचा निर्धार ...
नाशिक : साहित्य संमेलनात ग्रंथप्रदर्शन, प्रकाशन आणि साहित्य प्रसाराला पूरक भूमिका घेण्यास प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या शनिवारी झालेल्या बैठकीत अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील उपस्थित होते.
ग्रंथप्रदर्शन समितीचे सदस्य तसेच लोकहितवादी मंडळाचे पदाधिकारी यांच्या समवेत झालेली ही बैठक एकूण कामाला दिशादर्शक ठरली. संमेलन काळात अधिकाधिक पुस्तकांचे प्रकाशन करण्यात यावे, यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच प्रकाशन कट्ट्यावर ज्या लेखकांना पुस्तकाचे , ग्रंथाचे, काव्यसंग्रहाचे प्रकाशन करायचे असेल त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त दिलीप साळवेकर यांनी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.तर महामंडळाचे कार्यवाह डॉ. दादा गोरे यांनी आभार मानले. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये महामंडळाचे कोषाध्यक्ष रामचंद्र काळुंखे, सुनीताराजे पवार, कुंडलिक अतकरे ग्रंथप्रदर्शन समितीचे प्रमुख वसंत खैरनार आणि उपप्रमुख पंकज क्षेमकल्याणी तसेच साहित्य संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, कार्यवाह भगवान हिरे, सुभाष पाटील, सहकार्यवाह किरण समेळ, कोषाध्यक्ष चंद्रकांत दीक्षित यांनी सहभाग नोंदवला.
इन्फो
स्टॉलधारकांना जीएसटीतून दिलासा
कोरोना काळात व्यवसायावर आलेल्या संक्रांतीमुळे संकटात सापडलेल्या प्रकाशकांवर अतिरिक्त भार पडू नये, या उद्देशाने स्टॉलधारकांना आकारण्यात आलेले ६५०० शुल्क हेच कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे अतिरिक्त जीएसटी भरण्याची गरज नाही. त्यामुळे या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. ज्यांनी वेगळा जीएसटी भरला असेल त्यांना तो परत करण्याची व्यवस्था करावी असाही निर्णय घेण्यात आला.