गर्भवती लेकीची हत्या; बापाला फाशीची शिक्षा :आंतरजातीय विवाहाचा राग
By admin | Published: June 19, 2017 09:33 PM2017-06-19T21:33:32+5:302017-06-19T22:13:29+5:30
आंतरजातीय विवाह केल्याचा राग वर्षभर मनात धरून नऊ महिन्यांच्या गर्भवती लेकीची हत्या करणाऱ्या जन्मदात्यास सोमवारी (दि.१९) जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.
नाशिक : आंतरजातीय विवाह केल्याचा राग वर्षभर मनात धरून नऊ महिन्यांच्या गर्भवती लेकीची हत्या करणाऱ्या जन्मदात्यास सोमवारी (दि.१९) जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. आरोपी एकनाथ किसन कुंभारकर (४४) यास फाशीची शिक्षा सुनावली आहे. रिक्षामध्ये पोटच्या मुलीचा गळा आवळून हत्या केल्याची घटना २८ जून २०१३ रोजी शहरात घडली होती. या घटनेने नाशिक नव्हे तर संपूर्ण राज्य हादरले होते.
कामगारनगरमधील काशीनाथ कांबळे यांच्या कु टुंबातील दीपक कांबळे (२३) या तरुणाशी एकनाथ कुंभारकर यांची मुलगी प्रमिलाचे प्रेमसंबंध जुळले होते. वणीच्या गडावर जाऊन २०१२ साली त्यांनी विवाह केला होता. आंतरजातीय विवाह केल्यामुळे प्रमिलाविषयी राग मात्र पित्याच्या मनात कायम होता. सहा ते सात महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर कुंभारकर याने मुलीच्या घरी येणे-जाणे सुरू केले. जावयासह सासरच्या लोकांचा विश्वास संपादन केला. प्रमिला नऊ महिन्यांची गर्भवती असताना प्रसूतीच्या काही दिवसांपूर्वीच त्याने पहाटे तिच्या सासरी जाऊन ‘आजीची प्रकृती बिघडली आहे, असे खोटे सांगून प्रमिलाला सोबत घेऊन एकनाथ कुंभारकर निघाला व रिक्षामधून (एमएच १५, जे २५९५) निर्जन ठिकाणी फिरविले. सावरकरनगरमध्ये एका खासगी रुग्णालयासमोर रिक्षा थांबविली आणि रिक्षाचालकाला रुग्णालयातून मामाला बोलवावयास सांगितले. रिक्षाचालक रुग्णालयाच्या दिशेने गेल्यानंतर कुंभारकर याने स्वत:कडे असलेल्या परकराची नाडी काढून शेजारी बसलेल्या प्रमिलाचा गळा आवळला. रिक्षाचालक जवळ आला असता त्याने सदर प्रकार बघितला. यावेळी प्रमिलाच्या तोंडातून फेस येत होता. कुंभारकर याने त्वरित रिक्षातून पलायन केले. रिक्षाचालकाने अत्यवस्थ अवस्थेत प्रमिलाला खासगी रुग्णालयात नेले; मात्र रुग्णालयाने ‘पोलीस केस’ सांगून शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्याने प्रमिलाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. ‘आॅनर किलिंग’ प्रकरण असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या जन्मदात्यास फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी तेव्हापासून आजतागायत लेकीच्या आईने लावून धरली होती. न्यायालयाने या खटल्यात एकूण दहा साक्षीदार तपासले. न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील डॉक्टर, प्रत्यक्षदर्शी रिक्षाचालक, मुलीची आई, सासू यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सुमारे चार वर्षांनंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी कुंभारकर यास फाशीची शिक्षा सुनावली.