सरपंचावर कारवाईसाठी आंदोलनाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 01:40 AM2019-12-20T01:40:26+5:302019-12-20T01:41:12+5:30
मालेगाव तालुक्यातील दाभाडी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमताने ग्रामपंचायतीच्या कामात गैरव्यहार केला असून, त्यासंदर्भातील तक्रारी करूनही काहीच कार्यवाही होत नसल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेचे सदस्य व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण आंदोलन करण्याची केलेली तयारी पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मागे घ्यावी लागली आहे. सदर सरपंचावर लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्ते माघारी फिरले.
नाशिक : मालेगाव तालुक्यातील दाभाडी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमताने ग्रामपंचायतीच्या कामात गैरव्यहार केला असून, त्यासंदर्भातील तक्रारी करूनही काहीच कार्यवाही होत नसल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेचे सदस्य व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण आंदोलन करण्याची केलेली तयारी पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मागे घ्यावी लागली आहे. सदर सरपंचावर लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्ते माघारी फिरले.
दाभाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच चारूशिला अमोल निकम यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत मंजूर शौचालय अनुदानामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप सदस्यांनी केला असून, अनेक शौचालयांची कामे अपूर्ण असूनही निधी काढण्यात आलेला आहे. शौचालयाचे कामे निकृष्ट असून, काही लाभार्थ्यांच्या खात्यावरील अनुदान परस्पर काढून घेण्यात आले आहे. त्याचबरोबर अमरधाममध्ये कॉँक्रीट रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. मराठी शाळेला पत्रे बसविणे, बाजारपेठेत पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांना मासिक बैठकीत मंजुरी न घेता त्याच्या कामाचे परस्पर वाटप करणे, मासिक सभेमध्ये बहुतांशी सदस्यांनी या कामाची निविदा रद्द करण्याची मागणी केलेली असतानाही ती निविदा रद्द न करणे अशा स्वरूपाचा बेकायदेशीर कारभार केला जात असून, त्याबाबत पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येऊनही काहीच कार्यवाही होत नसल्याचे जिल्हा परिषद सदस्या संगीता संजय निकम यांनी निवेदनात म्हटले आहे. गुरुवारी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषणाची तयारी सुरू केली होती.