हॉकर्स झोनची तयारी अंतिम टप्प्यात

By admin | Published: December 19, 2015 11:52 PM2015-12-19T23:52:59+5:302015-12-20T00:05:23+5:30

नव्या वर्षात सुरुवात : संघटनांकडूनही सकारात्मक प्रतिसाद

Preparation of the Hawker's Zone in the final phase | हॉकर्स झोनची तयारी अंतिम टप्प्यात

हॉकर्स झोनची तयारी अंतिम टप्प्यात

Next

नाशिक : राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत शहरात हॉकर्स व नो हॉकर्स झोन निश्चित करण्यात आले असून, त्याला अंतिम रूप दिले जात आहे. हॉकर्स व टपरीधारकांच्या संघटनांनीही बव्हंशी मुद्द्यांवर सहमती देत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नव्या वर्षाच्या प्रारंभी शहरातील हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक महापालिकेमार्फत शहरात हॉकर्स व नो हॉकर्स झोन निश्चित करण्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. उपआयुक्त दत्तात्रेय गोतीसे यांच्या नेतृत्वाखाली हॉकर्स झोनचा आराखडा तयार करण्यात आला असून पोलीस, संघटना यांच्या हरकतीनंतर त्याला अंतिम रूप दिले जात आहे. लवकरच आयुक्तांसमवेत बैठक होऊन हॉकर्स झोनवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. जानेवारी २०१६ मध्ये शहरातील हॉकर्स झोन प्रत्यक्षात कार्यान्वित होण्यास सुरुवात होतील. आतापर्यंत महापालिकेकडे साडेनऊ हजार फेरीवाल्यांनी बायोमेट्रिक नोंदणी केली असून, संबंधित नोंदणीकृत व्यावसायिकांना परवाने दिले जाणार आहेत. दरम्यान, हॉकर्स व टपरीधारक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे आणि उपआयुक्त दत्तात्रेय गोतीसे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली भूमिका मांडली. संघटनेने काही मुद्द्यांवर आक्षेप घेत चर्चा केली. त्यात प्रामुख्याने, संघटनेने सुचविलेल्या पर्यायी जागांचा विचार व्हावा, हॉकर्स झोनची अंमलबजावणी करताना समान न्यायाचे तत्त्व अवलंबिण्यात यावे, वहिवाट नसलेल्या जागांवर हॉकर्स झोन करू नये, विभागनिहाय हॉकर्स झोन्सची स्पष्टता करावी, बायोमेट्रिक नोंदणी पुन्हा सुरू करावी, जप्त केलेला माल परत मिळावा, उघड्यावरील मांस विक्रेत्यांसाठीही रचना करावी आदिंसह विविध सूचना मांडण्यात आल्या. यावेळी गोतीसे यांनी काही मुद्द्यांवर सहमती दर्शवित संघटनांनाही सहकार्याची भूमिका ठेवण्याचे आवाहन केले. याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस सुनील संधानशिव, नारायण धामणे, किरण कासार, संजय बर्वे, नवनाथ लव्हाटे, पुष्पा वानखेडे, जया पाटील, जावेद शेख, अंजनाबाई धोंगडे, चंद्रकला पारवे, चित्रा मुसमाडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Preparation of the Hawker's Zone in the final phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.