खंडेराव महाराज यात्रोत्सवाची तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 10:33 PM2020-02-07T22:33:34+5:302020-02-08T00:04:59+5:30
महाराष्ट्राचे कुलदैवत व प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील खंडेराव महाराज यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
चांदोरी : महाराष्ट्राचे कुलदैवत व प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील खंडेराव महाराज यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
शनिवारपासून (दि. ८) यात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. याकरिता जहागीरदार पुष्कर हिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समितीची स्थापना करण्यात आली आहे. दरवर्षी माघ पौर्णिमेला यात्रोत्सवास प्रारंभ होतो. खंडेराव महाराज, हेगडी प्रधान मंदिर, दीपमाळ आकर्षकरीत्या सजविले आहे. खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची मंदिरात गर्दी असते. तीन दिवस चालणाºया यात्रोत्सवासाठी ग्रामपालिकेने मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. मंदिरास रंगरंगोटी करून रोषणाई करण्यात आली आहे. यात्रोत्सवाच्या मुख्य दिवशी काकड आरती होऊन मांडव टाकला जाणार आहे. संध्याकाळी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे. बारागाड्यांची सवाद्य मिरवणूक काढली जाणार आहे. बारागाड्या बघण्यासाठी आबालवृद्ध गर्दी करतात. ग्रामपालिकेने यात्रा परिसराची स्वच्छता करून वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केली आहे.
खंडेराव महाराज यात्रोत्सव एकाच दिवशी आल्याने सायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समिती, शांतता समिती, ग्रामरक्षक दल आदींच्या माध्यमातून शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यात येणार आहे.
- अनिल गडाख, पोलीसपाटील, चांदोरी