नायगाव येथे आठवडे बाजार भरविण्याची तयारी
By Admin | Published: September 16, 2016 10:29 PM2016-09-16T22:29:00+5:302016-09-16T22:29:11+5:30
नायगाव येथे आठवडे बाजार भरविण्याची तयारी
नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव येथे २४ सप्टेंबरपासून आठवडे बाजार सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. व्यावसायिकांनी या बाजारात सहभागी होण्याचे आवाहन नायगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील सुमारे १५ गावांचे केंद्रबिंदू म्हणून नायगाव पूर्वीपासून ओळखले जाते. ७०च्या दशकात या ठिकाणी जनावरांच्या खरेदी - विक्रीसह सर्वच बाजार मोठ्या प्रमाणात भरत असल्याचे सांगण्यात येते. नायगाव पंचक्रोशीच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली असून, दळणवळण वाढले आहे. परप्रांतीय व्यावसायिकांची संख्या नायगाव खोऱ्यात वाढली आहे. त्याचबरोबरच नागरिकांच्या गरजा ओळखून अनेक नवीन व्यवसाय येथे वाढले आहेत.
परिसरातील जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राह्मणवाडे, मोह, मोहदरी, शिंदे, जाखोरी, दारणासांगवी, जोगलटेंभी, सावळी, पिंपळगाव, तळवाडे, महाजनपूर येथील नागरिकांची बँक, सोसायटी, शाळा, बाजारहाट आदिंसह विविध कामांसाठी नायगाव येथे वर्दळ असते. सिन्नर, नाशिकरोड, सायखेडा या बाजारपेठांऐवजी नायगाव येथूनच भाजीपाला, किराणा, दैनंदिन गरजेच्या वस्तू, शेतोपयोगी वस्तू खरेदी करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नायगाव येथे पूर्वीप्रमाणेच आठवडे बाजार भरविण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला असल्याची माहिती सरपंच इंदुमती कातकाडे, उपसरपंच अनिता जेजूरकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी दिली आहे. (वार्ताहर)