नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
By admin | Published: September 30, 2016 01:30 AM2016-09-30T01:30:01+5:302016-09-30T01:45:41+5:30
सप्तशृंगगड : मुख्य रस्त्यावरील अतिक्र मणे हाच मोठा अडथळा
कळवण : नवरात्रोत्सवात सप्तशृंगगडावर होणाऱ्या शारदीय महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यात्रा महोत्सवासाठी देशभरातून लाखो देवीभक्त व भाविक येणार असल्याने रस्ता दुरु स्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत आणि भाविकांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन नियोजन करावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
नवरात्र यात्रोत्सवात रस्त्याच्या मध्यभागी दुकाने लावण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची स्थापना, सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी १६ एकरचा वाहनतळ, २८० जादा बसेसचे नियोजन, सुरक्षा व्यवस्थेसाठी सुमारे ५५० पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत देण्यात आली.
मुख्य रस्त्यावरील अतिक्र मणे दूर करून ते मोकळे होणे आवश्यक आहे. दुकानांवर जाळी, कापड लावण्यास प्रतिबंध करावा, यात्रोत्सवादरम्यान रुग्णवाहिका आणि अग्निशमन वाहन रस्त्यावरून जाऊ शकेल याची दक्षता घ्यावी, तलावाच्या ठिकाणी जीवरक्षक दलाचे स्वयंसेवक तैनात करण्यात यावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या. तलाव परिसरात प्रकाश व्यवस्था, विद्युतपुरवठा सुरळीत राहील यासाठी जोडण्यांची तपासणी करणे गरजेचे आहे.
भाविकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसह दोन उपअधीक्षक, १० पोलीस निरीक्षक, १५ पोलीस उपनिरीक्षक, २५९ पोलीस कर्मचारी आणि २१६ हेड कॉन्स्टेबल तैनात करण्यात येणार आहेत. अग्निशमन दलाची दोन वाहने तयार ठेवण्यात आली असून, सुरक्षेसाठी हॉटेल्सची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रस्त्याच्या मध्यभागी दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. भाविकांच्या मदतीसाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची स्थापना ट्रस्ट कार्यालयात करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षात सर्व विभागांचे प्रत्येकी एक अधिकारी २४ तास उपलब्ध राहतील.
बैठकीला तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक सुजय घाटगे, आगार व्यवस्थापक ए. आर. अहिरे, ट्रस्टचे विश्वस्त रावसाहेब शिंदे, राजेंद्र सूर्यवंशी, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, भिकन वाबळे, नेरकर, वैद्यकीय अधिकारी आर. एम. सपकाळे, संदीप बेनके, गिरीश गवळी, राजेश गवळी आदिंसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)