नाशिकरोड परिसरात नवरात्रोत्सवाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 01:29 AM2018-09-29T01:29:19+5:302018-09-29T01:30:01+5:30
बारा दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला असून त्यानिमित्ताने देवी मंदिरात तयारीच्या कामाने वेग घेतला आहे, तर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी नवरात्र साजरी करण्याचे नियोजन सुरू केले आहे.
नाशिकरोड : बारा दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला असून त्यानिमित्ताने देवी मंदिरात तयारीच्या कामाने वेग घेतला आहे, तर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी नवरात्र साजरी करण्याचे नियोजन सुरू केले आहे. गणेशोत्सवापाठोपाठ पितृपक्ष पंधरवाडा सुरू झाला असून १० आॅक्टोबरला घटस्थापना करण्यात येणार आहे. अवघ्या बारा दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रीमुळे युवा वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध देवी मंदिरात साफसफाई, स्वच्छता, रंगरंगोटी, मंडप उभारणी आदि कामांच्या तयारीला सुरूवात झाली आहे. सार्वजनिक मंडळाकडून देखील नवरात्रोत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात येत असून त्या दृष्टीने तयारीला सुरूवात करण्यात आली आहे. मंडप टाकणे, दांडीया-गरबा खेळण्यासाठी जागा सपाटीकरण करण्याचे नियोजन केले जात आहे. दांडीया-गरबा खेळण्यासाठी गर्दी व्हावी म्हणून नवरात्रोत्सव मंडळाकडून विविध स्पर्धा, बक्षिसे ठेवण्याचे नियोजन केले जात आहे. घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर गृहिणी वर्गाकडून देखील घरातील कामे करण्यास वेग आला आहे.
कार्यकर्त्यांमध्ये चिंता
यावर्षी गणेशोत्सवात डिजेला कोणत्याही परिस्थितीत परवानगी न देण्यात आल्याने नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दांडीया-गरबासाठी डीजे न लावल्यास गर्दी होणार की नाही या प्रश्नाने कार्यकर्त्यांमध्ये बेचैनी वाढली आहे.
दांडीया-गरबासाठी काही मंडळांनी बॅन्जो पार्टी, आॅर्केस्ट्रा व गुजराथी ढोल पथक बुक केले आहेत. नवरात्रोत्सव जसा जसा जवळ येत आहे तशी युवा पिढीची उत्सुकता वाढु लागली आहे. देवी मंदिरांमध्ये नवरात्रीच्या तयारीमुळे उत्साहाचे वातावरण पसरले आहे.