शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची तर मनसेची सीमोल्लंघनाची तयारी; अमित ठाकरे नाशिकमध्ये
By संजय पाठक | Published: October 23, 2023 05:25 PM2023-10-23T17:25:22+5:302023-10-23T17:26:01+5:30
अमित ठाकरे शस्त्रांची पूजा करण्यासाठी नाशकात, मुंबईला कार्यकर्ते नेण्याची स्पर्धा
नाशिक : शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या वर्षापासून मुंबईत दोन मेळावे होत असून आता या मेळाव्यासाठी शिवसैनिक जमवण्यासाठी देखील रस्सीखेच दिसून येत आहे. मंगळवारी (दि.२४) होणाऱ्या या मेळाव्यासाठी १५ हजार कार्यकर्ते रवाना होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर ठाकरे गटाने २० हजार कार्यकर्ते जाणार असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रथमच नाशिकमध्ये पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते शस्त्रास्त्र पुजन आयोजित करण्यात आले आहे.
शिवसेना प्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांनी दसऱ्याच्या दिवशी शिवर्तीर्थावर मेळावा घेण्याची परंपरा सुरू केली. त्यांच्यानंतरही हीच
परंपरा कायम असली गेल्या वर्षी शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फुट पडल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी दोन मेळावे झाले. यंदा शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदान येथे होणार असून त्यासाठी १५ हजार शिवसैनिक मुंबईस नेण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाची बैठक आज पार पडली. यात २० हजार कार्यकर्ते मुंबईला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने यंदा प्रथमच वेगळ्या पद्धतीने दसरा साजरा करण्यात येणार असून राजगडावर शस्त्रपूजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी दिली.