कळवणला विठोबा महाराज यात्रेची तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 02:00 AM2020-02-05T02:00:04+5:302020-02-05T02:00:25+5:30
कळवणकरांचे आराध्य दैवत विठोबा महाराज यात्रा महोत्सव दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा करण्याचा निर्धार कळवणकरांनी केला आहे. यंदा यात्रा स्थळावर पोलिसांची नजर असून, परिसरात ठिकठिकाणी हॅलोजन एलईडी बसवून परिसर प्रकाशझोतात राहणार आहे. यात्रेचे नियोजन व तयारी जोरात सुरू आहे.
कळवण : कळवणकरांचे आराध्य दैवत विठोबा महाराज यात्रा महोत्सव दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा करण्याचा निर्धार कळवणकरांनी केला आहे. यंदा यात्रा स्थळावर पोलिसांची नजर असून, परिसरात ठिकठिकाणी हॅलोजन एलईडी बसवून परिसर प्रकाशझोतात राहणार आहे. यात्रेचे नियोजन व तयारी जोरात सुरू आहे.
येथील विठ्ठल मंदिरात कीर्तन महोत्सवाला प्रारंभ झाला असून, ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान यात्रा महोत्सव समितीकडून विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेचा आनंद घेण्यासाठी तालुक्यातून हजारो भाविक सहभागी होणार आहेत.
यंदा भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता लक्षात घेऊन तसेच महिला व मुलींच्या छेडछाडीच्या घटना कमी करण्यासाठी कळवण शहरातील गल्ली बोळातील भाई व दादांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी यात्रा समितीचे अध्यक्ष नितीन पगार यांनी कळवणचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्याकडे केली. त्याची दखल घेत यात्रा काळात सर्वत्र कॅमेऱ्यांचा वॉच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
मागील घटना आणि अनुभव लक्षात घेऊन यात्रा समितीने नगरपंचायतीच्या सहकार्याने
यात्रेचे नियोजन केले आहे. यात्रा स्थळावर पोलीस यंत्रणा तैनात ठेवून गुन्हेगारांचा बंदोबस्त केला जाणार आहे.
आज रथाची मिरवणूक
बुधवारी (दि.५) सकाळी ९ वाजता विठोबा महाराज रथाची मिरवणूक कळवण शहरातून ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात येणार आहे. उद्योजक राजेंद्र मैंद, नगराध्यक्ष रोहिणी महाले व यात्रा समिती अध्यक्ष नितीन पगार हे यंदाच्या पूजेचे मानकरी आहेत. गुरुवारी (दि.६) जनतेसाठी लोकनाट्य तमाशा या सांस्कृतिक कार्यक्र माचे आयोजन गांधी चौकात करण्यात आले आहे. कै. राजाराम पगार कुस्ती आखाड्यात दि. ७ व ८ रोजी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले असून, आमदार नितीन पवारांसह महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर व महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीगीर यांना आमंत्रित करण्यात आले आहे.