मोठेबाबा यात्रोत्सवाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 10:12 PM2020-02-13T22:12:46+5:302020-02-14T00:43:16+5:30
सिन्नर तालुक्यातील दापूर येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान तथा हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेले मोठेबाबा यांच्या यात्रोत्सवास शुक्रवारपासून (दि.१४) प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा समितीच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान तथा हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेले मोठेबाबा यांच्या यात्रोत्सवास शुक्रवारपासून (दि.१४) प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा समितीच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मोठेबाबा यात्रेची ओढ लागलेल्या व नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेल्या चाकरमान्यांची पावले गावाकडे वळताना दिसत आहेत. दरवर्षी ही मंडळी यात्रेला हजर होत असते. मनोभावे मोठे बाबांची पूजाअर्चा करून आत्मिक प्रसन्नता घेऊन यात्रोत्सव आटोपल्यानंतर आपापल्या नोकरी अथवा व्यवसायाच्या ठिकाणी पोहोचतात. हा यात्रोत्सव म्हणजे स्थानिकांसह परगावी असलेल्या भूमिपुत्रांसाठी ऊर्जा देणारा ठरतो. यात्रेनिमित्त मोठेबाबा मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
दरवर्षी माघ वद्य सप्तमीला मोठेबाबा यात्रोत्सव भरतो. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात हिंदू-मुस्लीम बांधव एकोप्याने सहभागी होऊन यात्रोत्सव साजरा करतात. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आहे. शुक्रवारी (दि.१४) रात्री ९ वाजता संदल मिरवणूक काढण्यात येणार असून, ही मिरवणूक रात्री १२ वाजेपर्यंत सुरू असते. या मिरवणुकीत सहभागी मोठ्या संख्येने गर्दी होते. गलफ अर्थात चादर चढविण्याच्या कार्यक्रमात दोन्ही धर्मातील लोक सोबत असतात. नवसाला पावणारे मोठेबाबा म्हणून देवस्थानाकडे भाविक पाहतात. म्हणूनच नवसपूर्तीसाठी दंडवत, लोटांगण घालून पुष्पहार अर्पण केले जातात. दापूरसह गोंदे, चापडगाव, धुळवड परिसरातील लोक यात्रेत सहभागी होतात. त्यामुळे यात्रोत्सव काळात लाखो रुपयांची उलाढाल होते.
दरम्यान, शनिवारी (दि.१५) सायंकाळी बक्षुभाई दारूवाले (संगमनेर) शोभेची दारू उडविणार आहेत. आसमंत उजळून टाकणारी ही आकर्षक आतषबाजी यात्रोत्सवाचे आकर्षण असते. मनोरंजनासाठी रात्री ९ वाजता विठाबाई भाऊ मांग यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली. यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटीसह ग्रामस्थांनी केले आहे.
यात्रास्थळी मंदिराचा कायापालट
जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शीतल सांगळे व युवा नेते उदय सांगळे यांच्या प्रयत्नाने देवस्थान परिसराचा यात्रास्थळ निधीतून विकास साधण्यात आला आहे. जुन्या घुमटाचा जीर्णोद्धार करण्यात आला असून, मंदिर परिसर अधिक आकर्षक झाला आहे. त्यामुळे या भागाचा पूर्णपणे कायापालट झाला आहे.रविवारी (दि.१६) सकाळी ९ वाजता हजेरीचा कार्यक्रम होणार आहे. तसेच दुपारी ४ वाजता कुस्त्यांची दंगल होईल. कुस्त्यांच्या दंगलीने यात्रोत्सवाची सांगता होत असते. यात जिल्हाभरातील नामवंत पहिलवान सहभागी होतात. त्यांना १०१ रु पयांपासून २१०१ रुपयांपर्यंत बक्षिसे दिली जातात.