मौजे सुकेणे मंदिरात दत्त जयंतीची तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 09:17 PM2020-12-28T21:17:36+5:302020-12-29T00:06:50+5:30
कसबे सुकेणे : महाराष्ट्राचे प्रतिगाणगापूर म्हणून राज्यात आणि जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मौजे सुकेणे दत्त मंदिरात उद्या दत्तजयंती साजरी होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना कोरोनाविषयक खबरदारी घेऊनच दर्शनाला मुभा दिली जाणार असल्याची माहिती दत्त मंदिर संस्थानने दिली आहे.
मौजे सुकेणे येथे एकमुखी दत्त मंदिर असून महानुभाव पंथीयांचे हे प्रमुख तीर्थस्थळ आहे. दरवर्षी या मंदिरात हजारो भाविक दत्तदर्शन घेतात. यंदा मात्र कोरोनामुळे भाविकांच्या संख्येवर निर्बंध आले असून दत्त मंदिर संस्थानने कोरोनाविषयक संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या नियमावलीनुसार खबरदारी घेतली जात आहे. मंदिरात भाविकांना मास्क सक्तीचा करण्यात आला असून मंदिर परिसर, गाभारा, सभामंडपाचे निर्जंतुकीकरण, जंतुनाशक फवारणी, हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली असून, सोशल डिस्टन्सिंगसाठी मंदिरात एकाचवेळी एक असा प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती संस्थानचे महंत सुकेणेकरबाबा यांनी दिली. मंदिरात दत्तजयंती पर्वकाळाची तयारी पूर्ण झाली असून भाविकांना विनामास्क प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती पूज्य महंत सुकेणेकरबाबा, पूज्य अर्जुनराज सुकेणेकर, पूज्य बाळकृष्णराज सुकेणेकर, पूज्य गोपीराजशास्त्री सुकेणेकर व पूज्य राजधरराज सुकेणेकर यांनी दिली.
मौजे सुकेणे येथील दत्त मंदिर सुमारे ८०० वर्षे पुरातन आहे. याठिकाणी भगवान श्री चक्रधर स्वामी यांचे चरणांकित स्थान असून महानुभाव पंथीयांचे आद्य तीर्थस्थळ आहे. नाशिकहून मुंबई-आग्रा महामार्गाने ओझरमार्गे अवघे २७ किलोमीटर, तर औरंगाबाद राज्यमार्गाने चांदोरी किंवा पिंपळस येथून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर बाणगंगेच्या दक्षिण तीरावर निसर्गाच्या सान्निध्यात पूर्वाभिमुख उंच अशा गढीवर हे मंदिर आहे. मंदिराला दगडी बांधकाम असलेले पूर्व महाप्रवेशद्वार आहे. मंदिरातील पुरातन पेशवेकालीन लाकडी कोरीवकाम भाविक व पर्यटकांचे आकर्षण असून या मंदिरात शेकडो वर्षांपासून त्रिकाळ आरती, स्थानास दररोज पहाटे चंदन उटी दिली जाते.
मंदिरात व परिसरात भाविकांना मास्क सक्तीचा आहे. गाभाऱ्यात एकावेळी एक भाविकास प्रवेश दिला जाणार आहे. शासनाच्या नियमावलीचे पालन केले जाणार असून गर्दी होणार नाही, याची काळजी संस्थान घेत आहे.
- महंत सुकेणेकर, दत्त मंदिर संस्थान