खान्देशातील श्री कानबाई उत्सवाची सिडकोत तयारी
By संदीप भालेराव | Published: August 21, 2023 03:12 PM2023-08-21T15:12:23+5:302023-08-21T15:12:40+5:30
येत्या २८ रोजी कानबाई मातेची मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती रवी पाटील व नितीन माळी यांनी दिली.
सिडको : श्री कानबाई माता सार्वजनिक उत्सव समितीकडून सालाबादप्रमाणे यंदाही रविवारी (दि. २७) मनोभावे प्रतिष्ठापना केली जाणार असून, उत्सवाच्या तयारीची लगबग सिडको परिसरात सुरू झाली आहे. येत्या २८ रोजी कानबाई मातेची मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती रवी पाटील व नितीन माळी यांनी दिली.
खान्देशातील कानबाई आईचा उत्सव सिडकोत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सिडको परिसरात खान्देशातील नागरिकांची संख्या मोठी असून, खान्देशातील हा उत्सव सिडकोतही तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. कानबाईचा सण जवळ आल्याने उत्सवाची लगबग सिडको परिसरात सुरू झाली आहे. खान्देशात मरीआई, मुंजोबा, आसरा, रानबाई, कानबाई, भालदेव ही ग्रामदैवते असून ही दैवते आपले संकटापासून रक्षण करतात, अशी तेथील भाविकांची धारणा आहे. त्यामुळे या देवतांच्या सणाला विशेष महत्त्व असते.
खान्देशात अनेक सण, उत्सव अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याची प्रथा आहे. कानबाईची मिरवणूक पारंपरिक वाद्यांतच काढली जाते. कळसावर ठेवलेली प्रतीकात्मक कानबाई मानली जाते, त्यानुसार कानबाई आईची अतिशय आकर्षक सजावट केलेली असते. कानबाई चालनी गंगेवरी वं माय, चालनी गंगेवरी, साखर पेरत चालनी वं माय... पेरत चालनी... अशा रीतीने कानबाईला भावपूर्ण निरोप दिला जातो. यासाठी गोदावरीला भाविकांची विसर्जनाला गर्दी होते.