गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
By admin | Published: September 8, 2015 11:42 PM2015-09-08T23:42:31+5:302015-09-08T23:43:07+5:30
गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
इंदिरानगर : परिसरात गणेशोत्सव मंडळांची तयारी जोमाने सुरू असून, तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंडळांनी मंडप उभारणी करून देखाव्यांची तयारीही सुरू केली आहे.
गणेशोत्सव अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे घराघरात आणि गणेशोत्सव मंडळांनी तयारी जोमाने सुरू केली आहे. सध्या सिंहस्थ कुंभमेळा सुरू असल्याने वाहतुकीला कोणतीही अडचण येणार नाही, याचीही मंडळे काळजी घेणार आहेत.
भाजपा प्रणित युनिक ग्रुपच्या वतीने राजीवनगर येथील युनिक मैदानावर भव्य डोम उभारण्यात आला आहे. त्यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच सालाबादप्रमाणे महिलांच्या कलागुणांना वाव आणि स्वयंरोजगार मिळण्यासाठी सुमारे ३0 स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. यामध्ये खाद्यपदार्थ, वस्तूंसह विविध पाळणे, सिशोर, कपसॉयर, रोलर कोस्टर यांसह विविध खेळण्यांमुळे यात्रोत्सवाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. मंडळाचे संस्थापक नगरसेवक सतीश सोनवणे यांनी सांगितले.
शिवसेना प्रणित इंदिरानगर युवक मित्रमंडळाने यंदा गणेशोत्सवातील झगमगाटासाठी होणारा खर्च टाळून वैकुंठरथासाठी करणार आहे. वैकुंठरथ इंदिरानगरवासीयांसाठी नि:शुल्क राहणार असल्याचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संजय गायकर यांनी
सांगितले.
अजय मित्रमंडळाची ‘श्रीं’ची आगमनाची मिरवणूक सर्वांचे आकर्षण ठरते. शिस्तबद्ध लेजीम पथक आणि युवती, महिलांचा ढोल पथकाचा सराव सुमारे पंधरा दिवसांपासून सुरू आहे. यामध्ये सुमारे ५0 युवती, महिलांनी सहभाग घेतला आहे, असे संस्थापक अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी सांगितले.
अजिंक्य मित्रमंडळ, राजसारथी मित्रमंडळ, अरुणोदय मित्रमंडळ, सह्याद्री युवक मित्रमंडळ आदिंसह परिसरातील मित्रमंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.