भाजपावर कुरघोडीची सेनेची तयारी
By admin | Published: December 15, 2015 10:44 PM2015-12-15T22:44:10+5:302015-12-15T22:45:18+5:30
दुष्काळ : उद्धव ठाकरेंसह मंत्री, आमदारांचा गट जिल्हा दौऱ्यावर
नाशिक : शेतकरी आत्महत्त्येच्या जिल्ह्यात वाढलेल्या घटना, अपुऱ्या पावसामुळे अडचणीत आलेले शेतकरी व पाणीटंचाईचे भीषण संकट पुढे उभे ठाकले असताना भाजपाचे पालकमंत्री असलेल्या नाशिक जिल्ह्यात शिवसेनेने कुरघोडी करण्याची तयारी केली आहे. मराठवाड्याप्रमाणेच उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्री व आमदार येत आहे.या दौऱ्यात शासकीय यंत्रणांच्या बैठका घेऊन त्यांना कार्यान्वित करण्यात करण्यात येणार आहे.
या दौऱ्यात सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यासह शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रातील विधान परिषद व विधानसभेचे सदस्य सहभागी होणार आहेत. मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यावर अशाच प्रकारे शिवसेनेचे मंत्रिगट गेलेले असताना त्यावर भाजपाने आक्षेप घेत खिल्ली उडविली होती व त्यातून बरेच राजकीय वातावरण तप्त झाले होते, त्याच धर्तीवर सेनेच्या मंत्री, आमदारांची नाशिक भेटही गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक जिल्ह्णात चालू वर्षी ६० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी भाजपाचा एकही मंत्री वा आमदार जिल्ह्णात फिरकला नाही. अशा परिस्थितीत सेनेने थेट मंत्र्यांसह आमदारांनाच शेतकऱ्यांच्या उंबरठ्यापर्यंत नेण्याचे ठरविले आहे. शिवाय सरकारी यंत्रणेला कामाला लावून त्याचा राजकीय फायदाही या दौऱ्यात पदरात पाडून घेणे शक्य होणार आहे. भाजपाने काही केले नाही, पण आम्ही तुमच्या मदतीला धावून आलो, असा संदेश या माध्यमातून जाण्याची व्यवस्था सेनेने केली आहे.
शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करणार
शुक्रवारी सायंकाळपर्यंत नाशिकला येणाऱ्या सेनेच्या मंत्रिगटाने शनिवारी शासकीय यंत्रणेची बैठक बोलविली आहे. या बैठकीत पाणीटंचाई व त्या संदर्भातील उपाययोजना, टॅँकरस्थिती, शेतकरी आत्महत्त्या, रोजगार हमी योजनेच्या कामांची मागणी, दुष्काळसदृश जाहीर केलेल्या गावांसंदर्भात प्रस्तावित उपाययोजना, चारा टंचाई, कृषी वीजजोडणी संदर्भातील माहिती, शेतकऱ्यांच्या विविध योजनांची अंमलबजावणी, जलयुक्त शिवार योजनेची कामे, कांदाचे उत्पादन व भाव याचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीनंतर ही समिती काही गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधतील त्याचबरोबर आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहे.