नवरात्रोत्सवासाठी मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात ; तारुणाईच्या उत्साहाला उधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 06:09 PM2018-10-07T18:09:20+5:302018-10-07T18:11:41+5:30
नवरात्रोत्सवाला येत्या बुधवार (दि.१०) पासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी तरुणाई सज्ज झाली असून, गरबासोबतच प्रमुख आकर्षण ठरणाऱ्या रास दांडियाच्या तयारीचा उत्साह विविध ग्रुप्समध्ये दिसून येत आहे. दांडियासाठी लागणाऱ्यां विविध प्रकारच्या टिपऱ्याही बाजारात दाखल झाल्या असून, पारंपरिक, तसेच वैविध्यपूर्ण प्रकारच्या पोशाखांसह वेशभूषाकारांनाही मागणी वाढली आहे.
नाशिक : नवरात्रोत्सवाला येत्या बुधवार (दि.१०) पासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी तरुणाई सज्ज झाली असून, गरबासोबतच प्रमुख आकर्षण ठरणाऱ्या रास दांडियाच्या तयारीचा उत्साह विविध ग्रुप्समध्ये दिसून येत आहे. दांडियासाठी लागणाऱ्यां विविध प्रकारच्या टिपऱ्याही बाजारात दाखल झाल्या असून, पारंपरिक, तसेच वैविध्यपूर्ण प्रकारच्या पोशाखांसह वेशभूषाकारांनाही मागणी वाढली आहे. दरम्यान, सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी मंडप उभारणीच्या कामांना वेग दिला आहे. बहुतांश मंडळांचे मंडप व देखावे अंतिम टप्प्यात असून, आता रोषणाई आणि गरब्याच्या जागेवर गर्दीचे नियोजन करण्याची तयारी मंडळांकडून सुरू आहे.
नवरात्रोत्सवात नाशिक शहरासह जिल्ह्यात दांडियाची मोठ्या प्रमाणात धूम असते. त्यासाठी तरुणाई आधीपासूनच तयारी करते. उत्सवासाठी लागणारे ड्रेस, विविध प्रकारच्या दांडिया दर वर्षी खास खरेदी केल्या जातात. शहरात मुख्यत्वे करून पेठ हरसूल सुरगाण्यासोबत धुळे, नंदुरबारसह गुजरातमधीलही काही आदिवासी भागातून दांडिया विक्रीसाठी येतात. एक महिना अगोदर हे अदिवासी बांधव रामसेतूजवळ असलेल्या म्हसोबा पटांगणावर ठाण मांडून दांडिया विक्रीसाठी दुकाने लावतात. साधरणत: पेरूच्या झाडाच्या काठ्या यासाठी वापरल्या जातात. पेरूची काठी टणक असल्यामुळे ती सहसा लवकर तुटत नाही. त्याचप्रमाणे अन्य झाडांच्या लाकडाचा वापरही यासाठी केला जातो. या टिपºया पॉलिश पेपरने घासून त्यावर रंग चढविला जातो. त्यानंतर त्यांची होलसेल भावात विक्री केली जाते. या टिपऱ्या घेण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून व्यापारी येतात. शेकडोंच्या मोळीत बांधलेल्या टिपऱ्यांची व्यापऱ्यांसह किरकोळ स्वरूपात दांडियाप्रेमींच्या समूहांनाही विक्री केली जाते.
नव्या डिझाइन्सचे आकर्षण
शहरातील बोहरपट्टीतदेखील टिपऱ्यांची विक्री होते. या ठिकाणी नवनवीन डिझाइन्सच्या टिपऱ्या आल्या आहेत. टिपऱ्यांना आकर्षक कापडाचे वेस्टन लावण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कलाकुसरदेखील करण्यात आली आहे. लोखंडी टिपऱ्यां ना बेअरिंग लावण्याची जुनी पद्धत आहे, त्या टिपऱ्यांही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे गुजरातच्या काही भागांतून मंडळी टिपऱ्यां च्या विक्रीसाठी आली आहेत. त्यांनी रविवार कारंजा परिसरात दुकाने थाटली आहेत. नाशिकरोडचा शिवाजी पुतळा परिसर, सातपूरचा बाजार येथेही मोठ्या प्रमाणात टिपऱ्यां उपलब्ध आहेत. अधिक फॅशनेबल टिपऱ्यांसाठी आॅनलाइन सर्चही तरुणाईकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे.
क्लासेसद्वारे दांडियाचे धडे
इतरांपेक्षा आपला दांडिया वेगळा असावा यासाठी दांडिया खेळणाऱ्यांनी विविध ठिकाणी क्लास लावले आहेत. ज्यांना अजिबातच खेळता येत नाही, अशांनी प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे, तर जे पूर्वीपासून दांडिया गरबा खेळतात, असे तरुण-तरुणी नवनवीन प्रकार शिकण्यात तल्लीन झाले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ज्येष्ठांनीदेखील आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.