शाळा सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:16 AM2021-01-03T04:16:20+5:302021-01-03T04:16:20+5:30
नाशिक : जिल्हाभरात सोमवारपासून (दि.४) नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात असताना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ...
नाशिक : जिल्हाभरात सोमवारपासून (दि.४) नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात असताना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळांमध्ये जोरदार स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून सॅनिटायझर फवारणी आणि शिक्षकांच्या कोरोना चाचणीला विशेष प्राधान्य दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणून नाशिक एज्युकेशन सोसोयटीने एका खासगी कोरोना टेस्टिंग लॅबच्या मदतीने शनिवारी (दि.२) संस्थेच्या शिक्षकांची तपासणी करून घेतली आहे. शासनाच्या सूचनेनुसार, ४ जानेवारीपासून जिल्ह्यातील शाळांमध्ये नववी ते बारावीच्या विज्ञान, गणित, इंग्रजी विषयांच्या तासिका होणार असून त्यासाठी या विषयांच्या तीन शिक्षकांसह एक शिपाई, कारकून आणि मुख्याध्यापकांची कोरोना चाचणी करून घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने शिक्षण विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार नाशिक महापालिका व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नियोजन केले असले तरी जिल्हाभरातील शिक्षकांची संख्या लक्षात घेऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि सोयीसाठी सारडा कन्या विद्यालयात संस्थेच्या शिक्षकांच्या चाचणीसाठी विशेष शिबिरातून आवश्यकतेनुसार २८९ शिक्षकांच्या शनिवारी चाचण्या करण्यात आल्या. या सर्व चाचण्यांचा खर्च संस्थेने उचलला असून संस्थेच्या सर्व १२ शाळांमध्ये सॅनिटायझर व मास्कसह ऑक्सिमीटर, थर्मल स्क्रीनिंग उपकरणे उपलब्ध करून देण्यात आल्याचे संस्थेचे कार्यवाह राजेंद्र निकम यांनी सांगितले.
---
संस्थेच्या सर्व शाळांमध्ये शाळा स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असून सॅनिटायझर, थर्मल स्क्रीनिंग, ऑक्सिमीटर आदी कोरोना प्रतिबंधात्मक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहेे. पालकांच्या संमतीसाठी प्रतिज्ञापत्र तयार करण्यात आले असून बहुतांश पालक मुलांना शाळेत पाठविण्यास सकारात्मक आहेत.
- प्रा. राजेंद्र निकम, कार्यवाह, नाशिक एज्युकेशन सोसायटी
(फोटो-पीएचजेए६९, ७२)