दुर्मीळ झुडुपांच्या लागवडीसाठी ५१५ खड्डे तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:27 AM2019-05-20T00:27:59+5:302019-05-20T00:28:29+5:30
येत्या पर्यावरण दिनाच्या औचित्यावर म्हसरूळ शिवारातील वनराईवर २७ प्रजातींच्या दुर्मीळ झालेल्या झुडुपांच्या ५१५ रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये फिरून झुडुपांची रोपे संस्थेने मिळविली आहेत.
नाशिक : वृक्षारोपण करून वाऱ्यावर न सोडता किमान पाच वर्षे त्याच्या संवर्धनाची हमी घेऊन त्यासाठी कष्ट उपसण्याची तयारी ठेवणाºया आपलं पर्यावरण संस्थेने मागील चार वर्षांपासून शहरात ‘नाशिक देवराई’, ‘नाशिक वनराई’ हे दोन प्रकल्प हाती घेतले आहे. याठिकाणी करण्यात आलेल्या हजारो रोपट्यांची दमदार वाढ झालेली आज दिसून येते. येत्या पर्यावरण दिनाच्या औचित्यावर म्हसरूळ शिवारातील वनराईवर २७ प्रजातींच्या दुर्मीळ झालेल्या झुडुपांच्या ५१५ रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये फिरून झुडुपांची रोपे संस्थेने मिळविली आहेत.
सातपूर शिवारातील वनविभागाच्या जागेवर देवराई विकसीत करण्यासाठी चार वर्षांपूर्वी लोकसहभागातून ११ हजार भारतीय प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यात आली होती. या रोपांची दमदार वाढ झाली असून, मागील वर्षी येथे संस्थेने भर टाकली ती नामशेष होणाºया दुर्मीळ रानवेलींची. जैवविविधता विकसित करून परिपूर्ण देवराई अन् वनराई साकारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अध्यक्ष शेखर गायकवाड यांनी सांगितले.
यावर्षी म्हसरूळ येथील वनराईचा तिसरा वाढदिवस अर्थात वचनपूर्ती सोहळा जागतिक पर्यावरणदिनी साजरा करण्यात येणार असून, त्यानिमित्ताने दुर्मीळ अशा २७ प्रजातींच्या जंगली झुडुपवर्गीय रोपांची लागवड या ठिकाणी केली जाणार आहे. म्हसरूळ येथील वनविभागाच्या आगारामधील जागेत तीन वर्षांपूर्वी लोकसहभागातून वनमहोत्सवांतर्गत साडेसहा हजार रोपट्यांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात आले आहे.
या प्रजाती मिळविण्यास यश
फंगला, दिंडा, हेंकल, सर्पगंधा, अश्वगंधा, पत्री निरगुडी, मुरूडशेंग, पांढरा कुडा, तांबडा कुडा, दुरंगी बाभूळ, अरणी, अग्निमंथ, भारंगी, ढायटी, चार प्रकारची कोरांटी, संकुपी, गिडेसा, कपवासी, हिंगणबेट, मेहंदी, काळी निरगुडी अशा विविध प्रजातीचे दुर्मीळ झुडुपवर्गीय वनौषधी रोपट्यांची लागवड जागतिक पर्यावरण दिनी वनराई येथे केली जाणार आहे.
समृद्ध निसर्ग परिचय केंद्र उभारण्याचा प्रयत्न
पुढील पाच वर्षांमध्ये शहराच्या या दोन टोकांना निसर्गप्रेमींना आगळेवेगळे समृध्द असे निसर्ग परिचय केंद्र देवराई, वनराईच्या रूपाने उपलब्ध होणार आहे. यासाठी आपलं पर्यावरण संस्थेने विडा उचलला असून लोकसहभागातून गायकवाड यांच्यासह संस्थेचे स्वयंसेवक अथक परिश्रम घेत आहेत. भारतीय प्रजातीची झाडे, झुडुपे, वेलींची लागवड व संवर्धनाने परिपूर्ण असे छोटेखानी जंगल विकसीत झाल्यास किटकांपासून पक्षी, प्राण्यांपर्यंत जैवविविधताही जोपासली जाण्यास मदत होणार असल्याचा विश्वास गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.