गावगुंडांची ब्ल्यू प्रिंट तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 12:09 AM2020-10-11T00:09:23+5:302020-10-11T00:34:55+5:30
महिला सुरक्षा, शेतकरी सुरक्षा याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. तालुका पातळीवर गावगुंडगिरी फोडून काढण्यासाठी समाजकंटकांची ब्ल्यु प्रिंट तयार ...
महिला सुरक्षा, शेतकरी सुरक्षा याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. तालुका पातळीवर गावगुंडगिरी फोडून काढण्यासाठी समाजकंटकांची ब्ल्यु प्रिंट तयार करण्यात येत आहे. अवैधरित्या गुटख्याची तस्करी, शस्त्र तस्करी रोखण्यासाठी सीमावर्ती नाके अधिक सक्षम करत आहोत.
- जिल्हा पोलीस अधीक्षक, नाशिक
अझहर शेख
प्रश्न : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गुन्हेगारीबाबत नेमकी भूमिका काय असणार?
- भूमिका स्पष्ट आहे, सद्रक्षणाय खलनिग्रहनाय ..! कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करत गुन्हेगारीचा बिमोड करायचा हाच प्रथम प्रयत्न राहणार आहे. कायदा हातात घेणाऱ्यांची कुठलीही गय केली जाणार नाही, अशावेळी व्यक्ती कोण आहे ते बघितले जाणार नाही तर केवळ कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीकडे लक्ष दिले जाईल. जिल्ह्याच्या सर्वच पोलीस ठाणेप्रमुखांची बैठक घेत याबाबत स्पष्टपणे त्यांनाही आदेश दिले आहेत. कुठल्याही प्रकारचे कोणाचेही गैरकृत्य, अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही.
प्रश्न : जिल्हा पोलीस दलाला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी कसे प्रयत्न करणार?
- ग्रामीण पोलीस दलाने अद्याप आपले ७ योद्धे गमावले आहेत. कोरोनाच्या काळात पोलीस दलाची ही मोठी हानी आहे. यामुळे येथून पुढे अशी दुर्घटना घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय प्रशासन खबरदारी म्हणून सर्व उपाययोजना करत आहे. सर्व कर्मचारी-अधिकारी यांना मास्क, सॅनिटायझरचा पुरवठा नियमितपणे वेळोवेळी करण्यावर भर दिला जात आहे. कर्मचाºयांना कर्तव्य बजावताना शक्यतो सुरक्षित अंतर राखण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आॅक्सिजनची गरज भासणाºया बाधित पोलिसांसाठी आडगाव येथे किमान १५० खाटांचे ग्रामीण पोलीस कोविड केअर सेंटर सुरु करण्याच्या हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत. ग्रामिण पोलीस कर्मचारी-अधिकारी हे माझे कुटुंब असून त्यांची सुरक्षा ही माझी जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यासाठी मी निश्चितच कटिबद्ध आहे.
प्रश्न जिल्ह्यात नव्याने कोणत्या संकल्पना राबविण्याचा मानस आहे?
- नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांश तालुक्यात गड, किल्ले, धरणे, प्रसिध्द तीर्थक्षेत्र, अभयारण्य आहेत. यामुळे जिल्ह्यात नेहमीच पर्यटकांचा राबता असतो. गिरिभ्रमण, धरण पर्यटन, निसर्ग पर्यटन, धार्मिक पर्यटन अधिकाधिक सुरक्षित व्हावे, यासाठी टुरिस्ट पोलिसिंग ही संकल्पना लवकरच येत्या नवीन वर्षांत अंमलात आणली जाईल. तसेच जिल्ह्यातील दामिनी पथक अधिक सक्षम करत महिलांवरील अत्याचार रोखण्याचा प्रयत्न असेल.
शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार यांची आर्थिक फसवणूक सहन केली जाणार नाही. परराज्यातील लबाड व्यापाºयांवर कारवाईसाठी विशेष तपास पथके तयार करण्यात आली आहेत. नाशिक जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र हे मोठे असले तरी तालुका पातळीवरील सर्वच पोलिस ठाण्यांना सतर्कतेच्या सूचना देत गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी सभोवताली घडणाºया गुन्हेगारी घटनांची निसंकोचपणे माहिती थेट पोलिस अधीक्षक कार्यालयाला कळवावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान टाळा
जिल्हावासीयांना कळकळीचे आवाहन आहे, कोणत्याही प्रकारे जातीय व सामाजिक, धार्मिक तेढ निर्माण होईल अशा पोस्ट नजरचुकीनेसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल करू नये. कुठल्याही पोस्टविषयी काही आक्षेप वाटल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा, ग्रामीण सायबर पोलीस तात्काळ संबंधितांवर कारवाई करतील.
फोटो- १० सचिन पाटील