लक्ष्मीपूजनासाठी सज्जता
By admin | Published: October 30, 2016 02:10 AM2016-10-30T02:10:09+5:302016-10-30T02:10:41+5:30
मनमाड : परिसरात दीपोत्सवाचा आनंद शिगेला मनमाड : परिसरात दीपोत्सवाचा आनंद शिगेला
मनमाड : शहर व परिसरात दीपोत्सवाची धमाल सुरू असून, शहराच्या मुख्य बाजारपेठेत दिवाळीसाठी लागणाऱ्या रांगोळ्या, झाडण्या, पणत्या तसेच अन्य साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. काही तासांवर येऊन ठेपलेल्या लक्ष्मीपूजनासाठी वह्या, चोपड्या, रजिस्टर, लाह्या, बत्ताशे तसेच अन्य साहित्याची खरेदी करून तयारी करण्यात येत आहे.
सर्वोच्च आनंदाचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळी सणाचे स्वागत करण्यात येत असून, घराघरातून आनंद ओसांडून वाहात आहे. दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध रंगांच्या रांगोळ्यांनी बाजारपेठ सजली असून, रंगीत रांगोळी तीस रुपये प्रतिकिलो तर पांढरी रांगोळी दहा रुपये किलोप्रमाणे विक्री करण्यात येत आहे. लक्ष्मी म्हणून घेतल्या जाणाऱ्या केरसुण्या, झाडण्यांची किंमत तीस रुपयांपर्यंत असून, टोपले पंचवीस रुपयांना विक्री होत आहे.
सर्वसाधारण चाळीस रुपयांपासून ते तीनशे रुपयांपर्यंत किमतीचे आकाशकंदील विक्रीसाठी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीत वीस टक्क्यांची वाढ झाली असल्याचे विक्रेते सांगतात. लक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरसुण्या, पणत्या, रांगोळ्या, बत्ताशे विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. येथून जवळच असलेल्या सटाणे या गावात तयार झालेल्या मातीच्या पणत्या मोठ्या प्रमाणात विक्रीस आल्या आहे. पणत्या बरोबर लक्ष्मीपूजनसाठी लागणाऱ्या लक्ष्मीच्या मूर्ती खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे.(वार्ताहर)