सुरक्षा यंत्रणेची तयारी पूर्ण
By admin | Published: February 10, 2016 12:01 AM2016-02-10T00:01:55+5:302016-02-10T00:02:19+5:30
पंतप्रधान येण्याची शक्यता : बॉम्बशोधक पथकासह अन्य यंत्रणा दाखल
सटाणा : बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पंचकल्याणक महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी सुरक्षा यंत्रणेचीही तयारी पूर्ण झाली असून, सहा बॉम्बशोधक पथक, तीन अग्निशमन पथक, दंगा नियंत्रक पथक, आठशे पोलीस कर्मचारी, शंभर पोलीस अधिकारी सर्वच फौजफाटा मंगळवारी दाखल झाला.
या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्याची शक्यता गृहीत धरूनच कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुंबईत मेक इन इंडियाचे लॉचिंग पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्याच दिवशी मोदी विशेष विमानाने मांगीतुंगी येथे उपस्थित राहणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्या दृष्टीने यंत्रणेने पावले उचलली आहेत.
मांगीतुंगी येथील भगवान
ऋषभदेवाच्या १०८ फूट विशालकाय मूर्तीचा गुरुवारपासून सलग आठ दिवस पंचकल्याणक महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यादरम्यान देश-विदेशातून पंधरा ते वीस लाख भाविक हजेरी लावणार असल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, वित्तमंत्री सुधीर मुनगंट्टीवार आदि व्हीआयपी मंडळींना मूर्ती निर्माण समितीने प्रत्यक्ष भेटीदरम्यान निमंत्रण दिले आहे. त्यासाठी गुप्तचर यंत्रणा आणि लष्करच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण भागाची पाहणी केली होती.
मात्र जिल्हा प्रशासनाला मोदींच्या उपस्थितीबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दरम्यानच्या काळात पंतप्रधान मोदी या कार्यक्रमास उपस्थित राहणार की नाही याबाबत अनिश्चिततता होती. परंतु अचानक गेल्या दोन दिवसांपासून सहा जिल्ह्यांचे बॉम्बशोधक पथकाने संपूर्ण परिसर पिंजून काढत तळ ठोकला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते
येत्या १४ फेब्रुवारी रोजी मेक इन इंडियाचे लॉचिंग आहे. या कार्यक्रमादरम्यान ते मांगीतुंगी येथे हजेरी लावण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात असून, त्या दृष्टीने सर्वच सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. काल बॉम्बशोधक पथकासह तीन अग्निशमन दलाचे पथक, आठशे पोलीस कर्मचारी, शंभर पोलीस अधिकारी, दंगा नियंत्रक पथक असा सर्व फौजफाटा मांगीतुंगीत दाखल झाला आहे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी तत्काळ तीन हेलिपॅड तयार करण्याचे काम सुरू आहे. सायंकाळी दंगा नियंत्रक पथकाकडून सातशे जणांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच सुरक्षा यंत्रणेकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा नियंत्रण कक्ष ताब्यात घेऊन कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येत आहे. (वार्ताहर)