३००च्या पाणीमीटरसाठी पोलिसांची अशीही तत्परता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:11 AM2019-03-19T01:11:04+5:302019-03-19T01:11:29+5:30

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाखो रुपयांची घरफोडी, चोऱ्यांचे प्रकार घडत असताना यातील संशयितांना पकडण्यासाठी व तपासासाठी पोलिसांना वेळ मिळत नाही.

 Preparedness of Police for 300 meter water meter | ३००च्या पाणीमीटरसाठी पोलिसांची अशीही तत्परता

३००च्या पाणीमीटरसाठी पोलिसांची अशीही तत्परता

Next

सिडको : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाखो रुपयांची घरफोडी, चोऱ्यांचे प्रकार घडत असताना यातील संशयितांना पकडण्यासाठी व तपासासाठी पोलिसांना वेळ मिळत नाही. दुसरीकडे अवघ्या तीनशे रुपये किमतीच्या पाणीमीटर चोरीच्या तपासासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी मालकाच्या घरी हजेरी लावत पंचनामा केला.
पाथर्डीफाटा येथील रहिवासी सोपान दगडू नायकवाडी यांचे अंबड येथील शांतीनगर वसाहतीत एका शॉपमध्ये कंपनीचे कामकाज चालते. नायकवाडी यांनी त्यांच्या शॉपच्या बाहेरच्या जागेत पाणीमीटर बसविले असून, या पाणीमीटरची चोरी झाल्याने त्यांनी थेट आॅनलाइन तक्रार केली. या तक्रारीची माहिती अंबड पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने नायकवाडी यांना पोलीस ठाण्यात बोलविले.
याप्रकरणी अंबड पोलिसांनी गेल्या १६ मार्च रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पाणीमीटर चोरीचा गुन्हादेखील दाखल करीत पंचनामाही केला.
दुसरीकडे मार्च महिन्याच्या सुरुवातीस सिडकोतील खांडेनगरच्या सिद्धिविनायक कॉलनी परिसरात चोरट्यांनी बंद घराच्या गॅलरीचा दरवाजा तोडून घरातील सोने-चांदीचे दागिने व रोकड असा सुमारे सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत अंबड पोलीसत नोंदही करण्यात आली मात्र या चोरीचा तपास लागू शकलेला नाही.
सिडको परिसरात घरफोडी तसेच सोनसाखळी चोरीच्या घटनांनी उच्छाद मांडलेला असताना या घटनांच्या तपासाची तत्परता मात्र पोलिसांना दाखविता आली नाही. शासनाच्या पोर्टलवर दाखल झालेली तक्रार अंबड पोलीस ठाण्यात वर्ग झाल्यानंतर शासनाला लागलीच उत्तर द्यावे लागत असल्याने पोलिसांनी तपासाला गती दिली. मात्र पोलीस ठाणे पातळीवर दाखल झालेल्या तक्रारींची फारशी दखल घेतली जात नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

Web Title:  Preparedness of Police for 300 meter water meter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.