रहाड खोदण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:30 PM2019-03-19T23:30:22+5:302019-03-20T01:02:55+5:30
रंगोत्सवाच्या (रंगपंचमी) निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचवटीतील शनिचौकात असलेल्या पेशवेकालीन रहाडीत येत्या सोमवारी रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, धुळवडीनंतर शनिवारपासून रहाड खुली करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
संदीप झिरवाळ । लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : रंगोत्सवाच्या (रंगपंचमी) निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचवटीतील शनिचौकात असलेल्या पेशवेकालीन रहाडीत येत्या सोमवारी रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, धुळवडीनंतर शनिवारपासून रहाड खुली करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. सोमवारी रंगपंचमीला नाशिक शहरातील शेकडो रंगप्रेमी रहाडात रंगून निघणार आहे. जुन्या नाशकातील रहाड काही अपरिहार्य कारणास्तव बंद राहणार असल्याने शनिचौकात रहाडावर रंगप्रेमींची तोबा गर्दी होण्याची शक्यता आहे.
शनिवारी सकाळी पंचवटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तसेच सुनील महंकाळे, संतोष भोरे, बंटी भोरे यांच्या हस्ते रहाडाचे विधीवत पूजन केले जाईल त्यानंतर श्रीफळ वाढवून रहाड खोदकामाला सुरुवात करण्यात येईल. नाशिक शहरातील सर्वांत जुनी आणि मोठ्या असलेल्या पेशवेकालीन रहाडाला सुमारे २५० वर्षांचा इतिहास असल्याचे शनिचौक मित्रमंडळातर्फे सांगण्यात आले.
१६ बाय १६ फूट लांबी व रुंदी असलेल्या रहाडाची खोली जवळपास ९ फूट आहे. परंपरेनुसार यंदाही गुलाबी रंग तयार केला जाणार आहे. या रंगाचे वैशिष्टे म्हणजे सर्व रंगांमध्ये गुलाबी रंग आकर्षक दिसतो, गुलाबी रंगामुळे उन्हाळा बाधत नाही, कोणाला त्वचारोग झाले असतील तर ते त्वचा रोग रहाडात आंघोळ केल्याने बरे होतात. पूर्वी पहिलवान आणि गटातटाचे वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्यांची जागा म्हणून रहाडांची ओळख होती. गुलाबी रंगाने भरलेल्या रहाडात आंघोळ केल्यास किमान दोन ते तीन दिवस रंग निघत नाही असे जुने जाणकार मंडळी सांगतात.
लाखो लिटर पाणी साठवणूक क्षमता असलेल्या रहाडात उडी घेतल्यावर रहाडा भोवती उभ्या राहणाऱ्या नागरिकांच्या अंगावर रंगाचे पाणी उडते. काही वर्षांपूर्वी ऐन उन्हाळ्यात संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर दुष्काळाचे सावट पसरलेले होते त्यावेळी दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेऊन लाखो लिटर पाण्याची बचत व्हावी यासाठी उत्सव समितीने सामाजिक बांधिलकी म्हणून रहाड बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
यंदा धरणात जलसाठा असल्याने रंगपंचमीला रहाड खुली करण्याचे काम केले जाणार आहे. नाशिकची पेशवेकालीन रहाड अशी ओळख असलेल्या पंचवटीच्या शनिचौक रहाडात रंगपंचमीला रंगोत्सवनिमित्त रंग खेळण्यासाठी शेकडो नाशिककर, आबालवृद्ध सज्ज झाले आहे. उत्सव समिती अध्यक्ष विजय मोजवती, राजेंद्र अदयप्रभू, अरविंद विसपुते, रघुनंदन मुठे, मनोज अदयप्रभू, महेश महंकाळे आदींसह शनिचौक मित्रमंडळ रंगपंचमी उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.
रंगोत्सव : दीक्षित कुटुंबाला रहाड पूजनाचा मान
येत्या सोमवारी दुपारी रहाडीचे मानकरी असलेल्या दीक्षित कुटुंबातील सदस्याच्या हस्ते रहाडीचे पूजन करण्यात येईल आणि नंतर सुरुवातीला दीक्षित रंगाने भरलेल्या रहाडीत आंघोळ करतील अन् त्यानंतर रंगोत्सवाला सुरुवात केली जाईल. सरदार रास्ते आखाडा तालीम संघ, शनिचौक मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या अनेक वर्षांपासून रंगपंचमीच्या दिवशी रंगोत्सवाचे आयोजन केले जाते.