प्रकल्पग्रस्त पुन्हा धरणात उड्या घेण्याच्या तयारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 06:59 PM2019-02-12T18:59:51+5:302019-02-12T19:00:45+5:30
महापालिकेने वाढत्या लोकसंख्येचा विचार करता कश्यपी धरणाची उभारणी केली, यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करताना त्यांना मोबदला देतानाच, पुनर्वसन व प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी फक्त २६ जणांना महापालिकेत सामावून
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्य कश्यपी धरणग्रस्तांचे पुनर्वसन व प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना महापालिकेच्या सेवेत सहभागी करून घेण्यास होणारा विलंब पाहता, पुन्हा एकवार पाचही गावातील प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाचा इशारा दिला असून, कश्यपी धरणग्रस्तांचे प्रश्न सुटेपर्यंत गंगापूर धरणात पाणी सोडण्यास विरोध दर्शवून प्रसंगी धरणाच्या पाण्यात उड्या घेण्याची तयारी चालविली आहे.
दोन दिवसांपूर्वीच धोंडेगाव, देवरगाव, गोळशी, खड्याची वाडी येथील ग्रामस्थांनी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. महापालिकेने वाढत्या लोकसंख्येचा विचार करता कश्यपी धरणाची उभारणी केली, यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करताना त्यांना मोबदला देतानाच, पुनर्वसन व प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी फक्त २६ जणांना महापालिकेत सामावून घेतले असून, उर्वरित ३६ जणांना आजही प्रतीक्षा आहे. शिवाय धरणात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. गेल्या वीस वर्षांपासून या संदर्भात सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा सुरू असतानाही त्याची दखल घेतली जात नसल्याचे पाहून २०१६ मध्ये प्रकल्पग्रस्तांनी थेट धरणाच्या पाण्यात उड्या घेतल्यामुळे सरकार खडबडून जागे झाले. त्यानंतर शासकीय समिती गठीत करून त्याबाबत वारंवार बैठका झाल्या, प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे ठरविण्यात आले, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने गंगापूर धरणात जेमतेम ५६ टक्केच जलसाठा आहे, धरणाच्या पाण्यावर असलेले आवर्तन पाहता, लवकरच कश्यपी धरणातून गंगापूर धरणात पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे खात्याने सुरू केले असून, कश्यपी धरणात ९३ टक्के म्हणजेच १७२६ दशलक्ष घनफूट इतके पाणी शिल्लक आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन कश्यपी धरणग्रस्तांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. महापालिकेने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, जलसंपदा विभागाने त्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे. या मागण्यांचा विचार न झाल्यास गंगापूर धरणात कश्यपीतून पाणी सोडू दिले जाणार नाही, तसा प्रयत्न केल्यास धरणात उड्या मारून जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सरपंच काशीनाथ दत्तू मोंढे, सुकदेव सोनू मोंढे, सोमनाथ लक्ष्मण मोंढे, राजाराम भिका बेंडकोळी आदी उपस्थित होते.